वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शिरूरकर हैराण

Image may contain: outdoor, food, water and textशिक्रापुर,ता.५ एप्रिल २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस तापमान वाढत असून उन्हाच्या कडाक्यामुळे तसेच ग्रामीण भागात होणा-या वीजेच्या भारनियमनामुळे शिरूरकर हैराण झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

गेल्या आठवडाभरापासून सूर्य अक्षरशा आग ओकत असल्याने उन्हाची तिव्रता वाढली असून तापमान सुमारे 40 अंशावर पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.एप्रिलच्या सुरवातीलाच उन्हाचे असहय चटके बसत असल्याने दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.येत्या दोन महिण्यात भिषण पाणीटंचार्इचा सामना करावा लागणार असल्याने परीसरातील नागरीकांनी चिंता व्यक्त केली आहे.या वाढत्या तापमानाची उन्हाची झळ शेतक-यांना सर्वात जास्त बसत आहे.शेतक-यांच्या फळबांगांचे या वाढत्या तापमानामुळे नुकसान होत आहे.फुलशेती ,कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय व शेतीपुरक व्यवसायावरही मोठया प्रमाणात तापमानाचा परीणाम होत आहे.

वीजेच्या भारनियमनामुळे फॅन, कुलर यांचाही वापर करता येत नसल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत.तर ज्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असतो तो देखील पूर्ण विद्युत दाबाने नसल्याने मोटारी सुरू होत नाहीत तर विद्युत उपकरणेही वापरता येत नाहीत.मोठया प्रमाणात विद्युत दाब कमी व जास्त होत असल्याने विद्युत उपकरणे जळून नागरीकांचे नुकसानही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऐन उन्हाळयात व विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत विजमहामंळाच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे.त्यामुळे परीसरातील नागरीक हैराण झाले आहेत.

शेतमजुर देखील शेतात दिवसभर काम करण्यास तयार नाहीत.त्यामुळे शेतक-यांना पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत शक्य तेवढे शेतीतील काम करावे लागत आहे.तर मजुर संघटना कंत्राटी पध्दतीने शेतमजुरीची कामे घेत आहेत व आपल्या सोयीने उन्हाची तिव्रता कमी झालेल्या वेळेत काम करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

प्रचंड उष्णतेमुळे पाण्याची पातळी खालवल्याने कांही गावामध्ये पाण्याची समस्याही भेडसावत आहे.उन्हामुळे दुपारी लोक बाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.मात्र लग्नसरार्इमुळे नार्इलाजास्तव भर उन्हातही अक्षता टाकण्यास उपस्थित रहावे लागत असल्याने लग्नकार्यातही कांहीसा विस्कळीतपणा आल्याचे चित्र दिसून येत आहे.वाढत्या उन्हामुळे शितपेये व कलिंगडाच्या विक्रीत मात्र वाढ झाल्याने शेतक-यांच्या कलिंगड व खरबुजाला चांगला भाव मिळत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या