सोशल मिडियावर 'तो' हॅशटॅग होतोय जोरदार व्हायरल

पुणे,ता.१५ एप्रिल २०१८(सतीश केदारी) : कथुआ बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरात सोशल मिडियावर अनेक सेलिब्रिटींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर सोशल मिडियावर #JusticeForAsifa हॅशटॅग जोरदार व्हायरल होताना पहावयास मिळत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कथुआ येथे बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.त्यानंतर सर्वञ या घटनेबाबत अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.यामध्ये अभिनेञी प्रियंका चोप्राने राजकारण आणि धर्माच्या नावाखाली किती छोट्यांचा बळी जाणार आहे? यावर ताबडतोब कारवाई करणं हे ती छोटी मुलगी आणि माणुसकीप्रति आपलं कर्तव्य आहे असे म्हटले आहे.तर जावेद अख्तरनी ट्विट करुन ती असिफा मुलगी कोण? ती एक 8 वर्षांची बकरवाल्याची चिमुरडी. बकरवाले कोण आहेत? ही एक बंजारा जात आहे. त्यांनीच कारगीलमधल्या घुसखोरांची माहिती लष्कराला दिली होती. आणि आता जे लोक बलात्कार करणाऱ्यांच्या मागे उभे आहेत, ते कोण आहेत? असं म्हटलं आहे.अभिनेते कमल हसन यांनी तुमची मुलगी असती तरच तुम्ही हे समजून घेतलं असतं का? ती माझीही मुलगी असू शकली असती. एक पुरुष, वडील आणि नागरिक म्हणून मला संताप आलाय. मी माफी मागतो की आम्ही तुझ्यासाठी सुरक्षित देश नाही बनवू शकलो. मी तिच्या न्यायासाठी लढेन, म्हणजे पुढे भविष्यकाळात कुठल्याही चिमुकलीबरोबर असं होता कामा नये असं ट्विट केलंय.

संवेदनशील अभिनेञी म्हणुन ओळख असलेल्या स्पृहा जोशी ने फेसबुकद्वारे तीव्र भावना व्यक्त करणारी पोस्ट केली आहे.

अभिनेञी स्पृहा जोशीची फेसबुक पोस्ट
Image may contain: 1 person, night and closeup
काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?
मला जे काही वाटतंय त्याने तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे ? आठ वर्षांचं ते 'असिफा' नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे... #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्तं. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटींग्स, शुटिंग्स, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स... सगळं.. रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्याक्षणी वाचली तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलाही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्यापद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीने पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीये, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये त्यात कसं 'असायचं' आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललंय आसपास??

मी खूप ठरवलं की यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयेत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, "अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी हि बनती." मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा. रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीये आपण समाज म्हणून ? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीये. ही गुंगीची गोळी देऊन अक्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेने पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची; देवाची. नुसती प्रदर्शनं.. नुसत्या आराशी!

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंबाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याश्या पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी 'शू' करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते...आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानी.. गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला....

मला खरंच खूप भीती वाटतीये. की मी या अशा जगात राहतेय जिथे हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशनने वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! 'आपले - त्यांचे', 'माझ्या जातीचे - त्याच्या जातीचे' या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी 'लक्तरं' निघतायत; त्याने मी उभी आडवी नासवली जातीये. दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीये!
- स्पृहा जोशी.


सोशल मिडियावर फेसबुकद्वारे अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला जात असुन अनेकांनी परखड विचार व्यक्त केले आहेत.फेसबुक वर #justiceforAsifa हा हॅशटॅग जोरदार व्हायरल होत आहे.व्हॉट्सअप वर देखिल या संबंधी वेगाने मेसेज व्हायरल होत असुन अनेकांचे व्हॉटस अप डिपी काळे केले असुन ग्रुपचे डिपीही काळे करुन जोरदार निषेध व्यक्त केला आहे.सोशल मिडियावर ही दोन मतप्रवाह असुन भगवे-काळे डिपी ठेवले जात असल्याचे पहावयास मिळु लागले.

गेल्या वर्षी आराध्या या मुलीला वाचवण्यासाठी नेटक-यांनी #SaveforAradhya हा हॅशटॅग वापरला होता.तर #MeeToo वापरुन अनेक सेलिब्रिटी, महिला,तरुणींनी स्वत:सोबत घडलेला आयुष्यातील कटु प्रसंग कथन केला होता.दिवसेंदिवस सोशल मिडियावर अप्रिय घटनांच्या वेगाने प्रतिक्रिया उमटत असल्याचे या #justiceforAsifa हा हॅशटॅगद्वारे अनुभवायला मिळत असुन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या