निमोणेकरांनी 'त्या' मायलेकींना दिला 'माहेरचा आसरा'
निमोणे,ता.१८ एप्रिल २०१८(तेजस फडके) : अनोळखी मुलुख..अनोळखी प्रदेश..भाषेची अडचण..जवळचे संपलेले पैसे अशा द्विधा संकटात सापडलेल्या दोन मायलेकींना निमोणेकरांनी माहेरचा आसरा देत मदत केली.
सविस्तर हकिकत अशी कि, आंध्रप्रदेश येथुन काही दिवसांपूर्वी शिरूर येथे काही कामगार रस्त्यांच्या कामासाठी आले होते.त्यातल्या एका कामगाराच्या पत्नीची गावी जात असताना पतीबरोबर चुकामुक झाली.तिला मल्याळम भाषे व्यतिरिक्त कोणतीही भाषा येत नसल्याने ती पतीला शोधत शोधत निमोणे येथे आली.
यावेळी निमोणेतील सामाजिक कार्यकर्ते भरत हिंगे यांनी त्या महिलेची विचारपुस केली.परंतु भाषेच्या अडचणीमुळे तिच्याशी संभाषण करण्यास अडचण येत होती.हि अडचण लक्षात येताच
'निमोणे आयडॉल्सचे' सदस्य युवा कार्यकर्ते मयुर ओस्तवाल यांनी त्यांच्या चेन्नई येथील मित्राला फोनवर संपर्क करुन त्या महिलेचे व मित्राचे बोलणे करुन दिले. चेन्नई येथील मित्राने त्यांच्या गावाची माहिती व त्यांची अडचण समजून घेतली त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी ह.भ.प.पोटे महाराज, डॉ पुरुषोत्तम जगदाळे, बाळा कंगणे, आबासो थोरात, सुजित काळे, बिभीषण गायकवाड, पप्पू पाटील,अभय काळे, सागर साकोरे या सर्वांनी आर्थिक मदत देउ केली.
निमोणेकरांनी या मायलेकींना ख-या अर्थाने माहेरचा आसरा देत मदत केल्याने त्या दोन मायलेकींच्या चेह-यांवर निमोणेकरांच्या प्रती समाधान व आभार केल्याचे भाव दिसुन येत होते.निमोणेकरांनी या घटनेतुन माणुसकिचा झरा अद्याप कायम असल्याचे दाखवुन दिले आहे.