राज्यातील अडीच लाख घरांना डिसेंबर पर्यंत वीजजोडणी

बारामती, ता. ९ मे २०१८(प्रतिनीधी) : राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाडे व घरांना सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे.

राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहे. त्यापैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे. उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत. मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात २०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेश आहे.

सद्यस्थितीत राज्यातील वाड्यापाड्यांची संख्या सुमारे १ लाख ६ हजार ९३९ एवढी आहे. त्यापैकी ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांवर यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित १ हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२ वाड्यापाड्यांना दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून व ३४७ वाड्यापाड्यांना स्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची गरज आहे, अशा ठिकाणी विविध योजनेंतून निधी मिळवून तसेच दुर्गम भागात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकरणाद्वारे (मेडा) वीजजोडणी देण्यात येणार आहे.

राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या