...मग डमी आमदारांकडे स्टिकर येतातच कुठून?

Image may contain: car and outdoor
शिक्रापूर
, ता. 11 मे 2018:
शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी विधानसभा सदस्याचे स्टिकर लावून फिरणाऱ्या गाड्यांवर बेधडक कारवाई करत गुन्हे दाखल केले. परंतु, या गाड्यांवर स्टिकर येतातच कुठून? व यांना कोणाचे पाठबळ आहे, अशी चर्चा नागरिकांसह सोशल मिडियावर सुरू आहे.

शिरूर तालुक्‍यात विधानसभा सदस्याचे स्टिकर लावून एक गाडी (एमएच 11, एमएफ 0047) फिरत असल्याचे शिक्रापुरात निदर्शनास आले होते. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी बेकायदा स्टिकर लावून फिरणारे सणसवाडीच्या माजी सरपंच गीता भुजबळ यांचे पती गोरक्ष भुजबळ यांच्यावर भारत सरकारचे राज्यचिन्ह (अयोग्य वापरास प्रबंध कायदा 2005 कलम 4 व 7) प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गरजेनुसार भुजबळ यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे गिरीगोसावी यांनी सांगितले.

शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबरोबरच ज्या आमदारांनी त्यांना स्टिकर दिले, त्या आमदारांनी कुणाला स्टिकर वाटले, याचीही माहिती घेतली जात आहे. विधानसभा सदस्याचे बेकायदा स्टिकर लावण्याचा पुणे शहर व जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. गेल्या काही दिवसांत खेड तालुक्‍यात अनेक गाड्या फिरत होत्या. परंतु, या कारवाईमुळे बेकायदा लावलेले स्टिकर नक्कीच गायब होतील.

विधानसभा सदस्य म्हणून बोगस स्टिकर जिल्हाभर वाटले जात आहेत आणि आलिशान गाड्यांवर ते झळकत आहेत. परंतु, या धनदांडक्यांना कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय असे कृत्य करणे शक्यच नाही. परंतु, पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांनी थेट कारवाई केल्यामुळे अनेकांनी हात वर केले आहेत. कोणी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचे म्हणत आहे तर कोणी आपण हे स्टिकर दिलेच नाही, असेही सांगत आहे. पालकमंत्री तर यावर काहीच बोलत नाहीत, अशी चर्चाही सोशल नेटवर्किंगवर सुरू आहे.

डमी आमदारांची काळी कृत्ये बाहेर काढा..
डमी आमदारांनी केलेली काळी कृत्य खरी बाहेर यायला हवीत. यांनी काय काय काळे धंदे केेलेत याबद्दलची माहिती जाहीर करावी, अशी मागणी नेटझन्स करत आहेत. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केलेल्या बेधडक कारवाईचे कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या