कोरेगाव भीमा दंगलबाधितांना तातडीने भरपाई: आठवले

Image may contain: one or more peopleकोरेगाव भीमा, ता. 12 मे 2018 : "कोरेगाव भीमामधील दंगलबाधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाईसह मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, वाडा पुनर्वसन गावठाण येथील पूजा सकट कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत व त्यांचे पुण्यात पुनर्वसन करण्यात येईल,' असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

आठवले यांनी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील दलित कुटुंबांची भेट घेऊन दंगलीची घटना, सद्यःस्थिती, पोलिस संरक्षण त्यांच्या तसेच सध्याच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसान बाधितांना लवकरात लवकर भरपाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दोषींवर कारवाई करताना चुकीची कारवाई होऊ नये, याचीही काळजी घेण्याची सूचना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवदे यांनी सद्यःस्थितीची माहिती देऊन दलित वस्तीत संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी त्यांनी केली.

या वेळी आठवले यांनी सकट कुटुंबाची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सकट कुटुंबास पूर्ण संरक्षण, त्यांचे घर जळाल्यामुळे विशेष बाब म्हणून पुण्यात पुनर्वसन, समाजकल्याण विभाग; तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभाग, जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी सूचना दिल्या. या वेळी परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, बाळासाहेब जानराव, हनुमंत साठे, शैलेंद्र चव्हाण, अशोक शीलवंत, संजय सोनवणे, शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे; तसेच पुजाचे वडील सुरेश सकट, भाऊ जयदीप सकट, चुलते व बहुजन लोक अभियानचे महासचिव वसंतराव सकट, नगर जिल्हा कॉंग्रेसचे दिलीपराव सकट, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी उपस्थित होते.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सकट कुटुंबाला एक लाखाची मदत दिल्याचे त्यांनी नमूद केले. पूजा सकट हिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून शवविच्छेदन अहवालानुसार संबंधित आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी करून पूजाच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आठवले यांनी या वेळी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या