वाळूचे ट्रक व वाढप्याचे काम करत सागर बनला तहसीलदार

Image may contain: 3 people, people standingन्हावरा, ता. 5 जून 2018: घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत केटरिंग व्यवसायिकासोबत पंगतीला वाढप्याचे व चिंचणी येथील नदीपात्रात वाळू भरणारा तरुण मजूर सागर अरुण ढवळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसीलदार बनला. संपूर्ण शिरूर तालुक्यातून सागरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सागर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती असल्याने त्यांना कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चिंचणी येथील नदीपात्रात वाळू भरण्याबरोबरच जणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत केटरिंग व्यवसायिकासोबत पंगतीला वाढप्याचेही काम करावे लागले. मेहनतीचे काम करत असतानाच त्यांनी अभ्यासावर भर दिला. कष्टाचे चीज होऊन आज ते तहसीलदार बनले आहेत. या संघर्षमय यशाबद्दल सागरचे व त्यांच्या आई-वडिलांचा सयुक्तिक सत्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

सागरचे प्राथमिक शिक्षण तालुक्‍यातील चिंचणी येथील शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण शिरूर येथे झाले. सागरचे वडील अरुण पक्षाघातामुळे आजारी आहेत, तर आई सुनीता अशिक्षित असून त्या शेतमजुरी करतात. आर्थिक परिस्थितीमुळे  ठेकेदाराकडे नदीपात्रात वाळू उपसण्याचे काम करावे लागले. मिळालेल्या पैशामधून त्याने पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बीएस्सी ऍग्रीचे शिक्षण घेतले. शिक्षण घेताना गावाकडे आला, की तो पुन्हा ठेकेदाराकडे जाऊन वाळू उपसून रोजंदारी करायचा व शिक्षणासाठी पैसे जमवायचा. त्यानंतर त्याने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी लागणारे साहित्य व शिकवणी लावण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे बॅंकेकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज काढले. या दरम्यान रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीत केटरिंग व्यवसायिकासोबत पंगतीला वाढप्याचेही काम केले. आईने बचत गटाकडून कर्जरूपी मदत करून पाठबळ दिले. त्यानंतर 2016 पासून त्याने तयारी सुरू केली. मागच्या वर्षी त्याची सीमाशुल्क विभाग आयकर विभागात निरीक्षकपदी निवड झाली होती. ती जबाबदारी पार पाडत मिळेल त्या वेळेत सागरने मागील वर्षभर पूर्णवेळ अभ्यास करून तहसीलदारपदाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला.

दरम्यान, सागरवर संपूर्ण शिरूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, अल्पशिक्षित आई वडिलांना तहसीलदार म्हणजे काय, त्यांचे काम काय हे अद्यापही माहीत नाही. त्यांना फक्त सागर परीक्षा पास होऊन साहेब झाला एवढेच त्यांना माहीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या