बाह्यवळण रस्त्याऐवजी पर्यायी मार्गाचा विचार: पाचर्णे

Image may contain: 3 people, crowd, wedding and indoor
तळेगाव ढमढेरे, ता. 5 जून 2018 (एन. बी. मुल्ला): चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ढमढेरे येथील बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांचा व स्थानिक नागरिकांचा विरोध असेल तर त्याला पर्याय शोधून व नव्याने सर्वेक्षण करून नव्याने बाह्यवळण रस्त्यासाठी आखणी केली जाईल, असे आश्वासन आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिले.

चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ढमढेरे बाह्यवळण रस्त्याला स्थानिक रहिवासी व शेतकऱ्यांनी प्रखर विरोध असल्याचे दर्शविण्यासाठी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार पाचर्णे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदारीकरणाचे काम करताना रस्ता शेतकऱ्यांच्या बागायती जमिनीतून व रहिवासी क्षेत्रातून बाह्यवळण काढून हा रस्ता तयार करण्याचा प्रशासनाने घाट घातलेला आहे. याच परिसरातून रीलायन्सची वायू वाहिणीही गेलेली आहे. त्यासाठीही ३० मीटर रुंदीचे भूसंपादन केलेले आहे. त्यामुळे या गैरसोयीच्या नवीन प्रस्तावित बायपासला विरोध करण्यासाठी तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील बाधित शेतकऱ्यांची नुकतीच तळेगाव ढमढेरे येथे बैठक झाली होती त्यानंतरची ही आमदारांच्या समवेत बैठक होती.

वास्तविक पूर्वनियोजना नुसार हा नवीन राष्ट्रिय महामार्ग चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा या राजमार्ग क्रमांक ५५ वरूनच होणार होता. त्यानंतर या मार्गात बदल करून चाकण - पिंपळे जगताप - एल अँड टी फाटा- माळी मळा- तळेगाव मुख्य रस्ता- न्हावरे असे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे शिक्रापूरला बाह्य वळण देऊन हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा तळेगाव ढमढेरे- पांढरी वस्ती मार्गे न्हावरे असे सर्वेक्षण होऊन तशा पद्धतीच्या खुणा केल्याने स्थानिकांनी व बाधित शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून, पूर्वीच्या राज्य मार्गावरूनच तळेगाव ढमढेरे गावातून हा रस्ता नेण्याची जोरदार मागणी केली आहे.

यावेळी बोलताना आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग हा शक्यतो गावातून नेता येत नसल्याने पूर्वीच्या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला भूसंपादन करून हा रस्ता तयार करणे शक्य नाही. तसेच एल अँड टी फाटा ते तळेगाव ढमढेरे या दरम्यान मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवासी क्षेत्र असल्याने हा दुसरा सर्वेक्षण केलेला पर्याय मागे पडला होता. त्यामुळे नव्याने सर्वक्षण करून पांढरी वस्ती मार्गे बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होते मात्र शेतकऱ्यांना हा रस्ता गैरसोयीचा वाटत असल्यास जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सर्वेक्षण अधिकारी व केंद्रीय प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन अन्य पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल. सध्याचे सर्वेक्षण अंतिम नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन रस्त्याचे काम केले जाणार नाही. स्थानिकांच्या मताशी सहमत असल्याचेही आमदार पाचर्णे यांनी सांगितले. या रस्त्याच्या चौपदारीकरणाचे काम प्रस्तावित असल्याने व रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे- न्हावरे-इनामगाव या दोन पदरी रस्त्याचे १२० कोटी रुपयांच्या निधीतून नूतनीकरण करण्यात येणार असून दिवाळीपर्यंत कामास सुरवात होईल तसेच तळेगाव ढमढेरे परिसरातील तळेगाव ढमढेरे-विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे-टाकळी भिमा, तळेगाव ढमढेरे-कासारी, तळेगाव ढमढेरे-एल अँड टी फाटा या रस्त्यांचेही काम मार्गी लागणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

या बैठकीस शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, सरपंच, भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव भुजबळ, माजी सरपंच पोपटराव भुजबळ, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती अरविंदादा ढमढेरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र भुजबळ, शिक्रापूरचे माजी सरपंच बापूसाहेब जकाते, भाजपाचे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, श्रीकांत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, रामदास भुजबळ, शिरूर बाजार समितीचे संचालक संभाजी ढमढेरे, संदीप ढमढेरे, कैलासदादा नरके, कैलास सोनवणे, श्रीकांत ढमढेरे, राजेंद्र मांढरे, सारंग तोडकर, बाबासाहेब दरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. गणेश तोडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या