दिव्याच्या उजेडात अभ्यास करत सुषमाने मिळवले 93 टक्के

Image may contain: 17 people, people smiling, people standing and outdoor
तळेगाव ढमढेरे, ता. 11 जून 2018 (एन.बी.मुल्ला):  विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या दाम्पत्याने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले. मुलीनेही  परिस्थितीशी झगडत घरामध्ये विजेची सुविधा नसताना देखील दिव्याच्या उजेडावर व शेजाऱ्यांच्या घरात अभ्यास करून परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवीत एक आगळावेगळा आदर्श शालेय मुलांपुढे ठेवला आहे.

विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिरात शिक्षण घेणाऱ्या सुषमा विठ्ठल काशीकर या विद्यार्थिनीने परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून, परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विठ्ठल काशीकर व मनिषा काशीकर हे स्वतःला काहीही शेती नसलेले तसेच फक्त एक साधी जुन्या काळातील खोली असलेले कुटुंब. मोलमजुरी करण्या शिवाय कोणताही पर्याय त्यांच्यापुढे नसताना देखील त्यांनी त्यांच्या मुलीला शिक्षणासाठी साथ दिली, अशा परीस्थित देखील परिस्थितीशी झुंजत घरामध्ये विजेची सुविधा नसताना देखील आई वडिलांच्या कामामध्ये मदत करून घरामध्ये दिव्याच्या उजेडात अभ्यास करत शिक्षणात नाव कमाविण्याची जिद्द ठेवली आणि दहावीमध्ये या विद्यालयामध्ये कोणालाही शाळा स्थापनेच्या १९८३ पासून आज पर्यंत कधीही न पडलेले असे ९३.२० टक्के गुण मिळवीत विद्यालयात पहिला क्रमांक मिळविला आहे. तिच्या परिस्थितीशी झगडत मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

सुषमाची यापुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. आम्हाला मुलीने मिळविलेल्या यशाचा अभिमान असून, यापुढील काळात परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघड होणार असल्याचे सुषमाची आई मनिषा काशीकर यांनी सांगितले आहे. सुषमाने मिळविलेल्या यशाबद्दल तिचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गवारे, सरपंच ललिता गाडे, पोलिस पाटील शरद लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, दत्तात्रय गवारे, सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ गवारे, भिवाजी दोरगे, मधुकर दोरगे, नंदकुमार चौधरी, सागर राऊत, शिवाजी गवारे, निकिता गवारे, रवींद्र मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच ललिता गाडे म्हणाल्या, सुषमाने विद्यालयात ९३ टक्के गुण मिळवीत शिरूर तालुक्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. यापुढील काळामध्ये तिला शिक्षणासाठी भरीव मदत करणार आहे.

सुषमाने आपल्या मनोगतात सांगितले की, घरात लाईट नसताना देखील दिव्याच्या उजेडात व शेजारी असलेल्या मैत्रिणींच्या घरी अभ्यास केला. मला आई-वडील व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले असल्याने मला यश मिळविता आले. उच्च शिक्षण घेऊन अभियंता बनण्याचे स्वप्न आहे.

दादासाहेब गवारे म्हणाले, सुषमाने गावाचे नाव उंचाविले आहे. शिक्षणासाठी विविध स्तरातून मदत मिळवून देणार असून, दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुषमाचे अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या