तमाशा रंगमंचावरील कलाकार झाला प्रत्यक्षात फौजदार

Image may contain: 1 person, selfie and closeup
सविंदणे, ता. 22 जून 2018: तमाशाच्या राहुटीत जन्म, तमाशाच्या फडावर आईचे कष्ट अन् शाळेची सुट्टी झाली की रंगमचांवर नृत्यअविष्कार. तमाशातील वगात पोलिसाची भूमिका साकारणारा कलाकार प्रत्यक्षात फौजदार झाला आहे. दिनेश मधुकर सकट असे या जिद्दी युवकाचे नाव.

दिनेशने युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तमाशात वाद्यकाम करत कधी सोंगाड्या तर कधी पोलिस तर कधी डान्सर. वेगवेगळ्या कला सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे अन् वेळ मिळाला की अभ्यास. तमाशातील रंगमंचावर पोलिसाची भूमिका साकारत प्रत्यक्षात फौजदार होण्याची किमया जिद्दी दिनेशने अमलात आणली आहे. भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम दिनेश करणार आहे.

दिशनेशची आई नंदा सकट या तमाशा कलावंत. अत्यंत गरीबीची परीस्थीती. तमाशा कलावंत म्हणून आठ महिण्याच्या तमाशात रोजदारी मिळवत काम करायचे. त्यामुळे दिनेशचा जन्म देखील तमाशाच्या राहुटीत झाला. दिनेशही पुढे तमाशात वेगवेगळ्या भूमिका साकारू लागला अन् प्रेक्षकांच्या नजरेस उतरू लागला. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर, दत्ता महाडिक पुणेकर, सर्जेराव जाधव या मोठ्या तमाशात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

दिनेश 2009-2010 मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. पाबळ येथे अतिशय खडतर परिस्थितीतून बी. कॅाम पर्यतची पदवी मिळवली. अनेक संकटांना सामोरे जावे लागले. 2016 मध्ये आई नंदा यांच्या अचानक झाला. तमाशामध्ये काम न करता मोठा अधिकारी व्हावे ही आईची इच्छा होती. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. पुण्यातील काही मित्रांनी यासाठी त्यांना मदत केली. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना प्रंचड ईच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या