महावितरणच्या मुख्य अभियंतापदी सुनील पावडे रुजू

Image may contain: 1 person, closeupबारामती, ता.२७ जुन २०१८(विशेष प्रतिनीधी)  : महावितरण बारामती परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदाचा कार्यभार सुनील रंगनाथ पावडे यांनी सोमवारी (दि.25) स्वीकारला. त्यांना प्रभारी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी या पदाची सूत्रे सोपविली.

मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील दरोडी (ता.पारनेर) येथील रहिवासी असलेल्या पावडे यांनी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीतील पदवी तर सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली आहे. पावडे हे तत्कालिन राज्य विद्युत मंडळात 1991 मध्ये कनिष्ठ अभियंतापदी बिरवाडी (जि. रायगड) शाखा कार्यालयात रुजू झाले.याच पदावर त्यांनी उल्हासनगर येथेही काम केले. 2006 मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली.या पदावर त्यांनी पुण्यातील कोथरूड व पर्वती विभागात तसेच बारामती परिमंडलातील सासवड विभागात काम केले. या कार्यकाळात वीजदेयक प्रणालीत सुधारणा करण्याबरोबरच वीजग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्रिसूत्री अभियानात वीजदेयक दुरुस्ती, वीज यंत्रणा दुरुस्तीसह नवीन वीजजोडणी देण्याचा उपक्रम पावडे यांनी यशस्वीरीत्या राबवलेला आहे.

नोव्हेंबर 2015 मध्ये अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती झाल्यावर त्यांनी पुणे ग्रामीण मंडल तसेच नाशिक शहर मंडलात काम केले. नुकत्याच झालेल्या 2018 च्या सरळसेवा भरतीमध्ये पावडे यांची मुख्य अभियंतापदी निवड झाली आणि त्यांनी सोमवारी बारामती परिमंडलाचा पदभार स्वीकारला. याआधी कार्यरत असलेले मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर सेवानिवृत्त झाले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या