व्हॉट्सअॅपवर आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार!

No automatic alt text available.
नवी दिल्ली, ता. 21 जुलै 2018: माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवरून आता 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे.

सोशल मीडियापैकी एक असलेल्या व्हॉट्सअॅपला केंद्र सरकारकडून नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आता त्यादृष्टीने व्हॉट्सअॅपने महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून शेअर होत असलेल्या 'फेक न्यूज' आणि 'मॉब लिंचिंग'च्या (जमावाकडून होणाऱ्या हत्या) घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप नवे फिचर सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यापुढे अनेक ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करता येणार नाहीत. व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगवरुन याबाबत माहिती दिली.

व्हॉट्सअॅप युझर एकाच वेळी पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करु शकणार नाहीत. बनावट युझरचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय युझर्ससाठी मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. युझर्स आता क्विक फॉरवर्ड बटणचाही वापर करु शकत नाहीत, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. क्विक फॉरवर्डचा ऑप्शन मीडिया मेसेजनंतर असतो. केवळ भारतात राहणाऱ्या युझर्ससाठी हे बदल असल्याचंही व्हॉट्सअॅपने सांगितलं.

व्हॉट्सअॅपने या ब्लॉगमध्ये सांगण्यात आले, की भारतीय युजर्संसाठी लवकरच नवीन फिचर सुरु करण्यात येत आहे. या नव्या फिचरमुळे व्हिडिओ किंवा मेसेज ठराविक ग्रुपमध्येच फॉरवर्ड करता येणार आहेत. तर भारतीय युजर्संना फक्त 5 ग्रुपमध्येच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहेत. त्यानंतर संबंधित युजर्सच्या व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड हा पर्यायच नाहीसा होणार आहे. मात्र, इतर देशातील व्हॉट्सअॅप युजर्संना 20 ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करता येईल.

दरम्यान, व्हॉट्सअॅपवरुन मेसेज आणि व्हिडिओ फॉरवर्ड करण्याचे प्रमाण सध्या भारतामध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसच्या माध्यमातून अनेकदा जातीय तेढ निर्माण होत असतात. त्यामुळे यावर कडक पावले उचलत व्हॉट्सअॅपने यावर हा पर्याय आणला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या