सौभाग्य योजनेअंतर्गत नवीन वीजजोडणी ताबडतोब घ्या

पुणे,ता.२६ जुलै २०१८ (प्रतिनीधी) : शहरी व ग्रामीण भागातील अद्याप विद्युतीकरण न झालेल्या घरांना केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेतून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सद्यस्थितीत युदधपातळीवर सुरु आहे.ज्यांना या योजनेतून वीजजोडणी मिळालेली नाही त्यांनी नजिकच्या संबंधीत कार्यालयात दि. 31 जुलैपर्यंत संपर्क साधावा व वीजजोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

केंद्र शासनाच्या सौभाग्य योजनेमधून लाभार्थ्यांच्या वीजजोडण्यांसाठी आवश्यक असलेली वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च शासनाकडून करण्यात येत आहे. या योजनेमधून मुख्यत्वे ग्रामीण व शहरी भागातील वीज उपलब्ध नसलेल्या घरांना वीजपुरवठा करण्यासाठी जोडण्या देण्यात येत आहेत. मात्र या योजनेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेली घरे, तात्पुरत्या निवासासाठी उभारलेल्या राहुट्या किंवा घरे तसेच शेतामधील घरे पात्र राहणार नाहीत.

या योजनेतून ग्रामीण भागात दुर्गम व दुरस्थ भागातील रहिवासी असणार्‍या अनुसूचित जाती, जमातींसह अतिशय गरीब व दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या घरांना विनाशुल्क वीजजोडणी देण्यात येईल. बीपीएल लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पाईंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येत आहे. तसेच दारिद्रय रेषेवरील (एपीएल) परंतु गरीब व आर्थिक मागास कुटुंबांच्या घरांना वीजजोडणीसाठी नाममात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे व त्यांनी या शुल्काचा वीजबिलातून 10 हप्त्यांद्वारे भरणा करायचा आहे. वीजजोडणी मिळाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना मासिक वीजबिल भरणे बंधनकारक आहे.महावितरणकडून गावपातळीवर सर्व्हेक्षण करून वीजजोडणी नसलेल्या घरांची यादी तयार करण्यात आली आहे.या सर्व्हेक्षणानुसार पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 25,684 लाभार्थ्यांची सौभाग्य योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना वीजजोडणी देण्याची कार्यवाही वेगाने सुरु आहे.

सौभाग्य योजनेसाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करताना काहींची नावे अनावधानाने सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अद्याप ज्या घरांना सौभाग्य योजनेतून वीजजोडणी मिळालेली नाही त्यांनी येत्या 31 जुलैपर्यंत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा व योजनेतील निकषांप्रमाणे ताबडतोब वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या