पिक विमासाठी शेतकऱयांना धरले जाते वेठीस (Video)


शिरूर, ता. 28 जुलै 2018 (तेजस फडके): पिक विमा ऑनलाइन भरण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख असून, ऑनलाइन सातबारा व तलाठी सही शिक्का मिळण्यासाठी शेतकऱयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विविध गावांमध्ये शेतकऱयांना वेठीस धरले जात आहे, अशी तक्रार शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे यांनी केली आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये अद्यापही पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकऱयांनी पेरणी केलेली नाही. पिक विमा भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. शेतकऱयांना ऑनलाइन सातबारा काढावा लागत आहे. परंतु, सर्व्हर प्रॉब्लेमुळे शेतकऱयांना सातबारा मिळत नाही. सातबारा मिळाला तर त्यावर सहीशिक्का घेण्यासाठी तलाठी उपलब्ध होत नाही. एकाबाजूला नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे सरकारी यंत्रणांकडून वेठीस धरले जात असल्याने शेतकरी या समस्यांना सामोरे जाताना दिसत आहेत.

पिकविमा फॉर्म भरण्यासाठी मंगळवार (ता. 31) हा शेवटचा दिवस आहे. परंतु, शनिवार व रविवार शासकीय सुटीचा दिवस आहे. फॉर्मवर तलाठ्यांची सही-शिक्का घेण्यासाठी अवघा सोमवारचा दिवस शिल्लक आहे. परंतु, अद्यापही अनेक शेतकऱयांना ऑनलाइन सातबारा मिळालेला नाही. दुसरीकडे सोमवारी तलाठी उपलब्ध होतील, याबद्दल साशंकता आहे. यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. www.shirurtaluka.com ने याबाबत मतचाचणी घेतली असून, नेटीझन्सने यावर टीकेची झोड उठविली आहे.

पिकविमा भरण्यासाठी शेतकऱयांना पंधरा दिवसांची मुदत वाढवून मिळावी. महसूल विभागाने तलाठ्यांना सजाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत सुचना कराव्यात. यामुळे शेतकऱयांचे नुकसान होणार नाही.
- सुहास काटे (मो. 8408095555) पुणे जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना.

शेतकऱयांना पिकविमा भरण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन या दोन्ही पद्धती ठेवाव्यात. ऑनलाइनला अडचण असल्यास ऑफलाइन कामकाज करता येईल. दोन्ही पद्धती ठेवल्यास शेतकऱयांच्या अडचणी दूर होतील.
- दिलीप थोरात, ग्रामपंचायत सदस्य, वाघाळे.
Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या