चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याने खंडाळेत अवतरली पंढरी

Image may contain: one or more people, people standing and outdoor
खंडाळे, ता.३१ जुलै २०१८ (ज्ञानेश पवार) : वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यामध्ये रुजवणे त्याचबरोबर राज्यशासनाच्या १३कोटी वृक्ष लागवडीचा प्रचार व प्रसार तसेच संत वचनाचे महत्व विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना समजावे यासाठी खंडाळे (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे नुकतेच आयोजन केले होते.

यावेळी “माऊली माऊली, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ , ग्यानबा तुकारामचा जयघोष करीत व अभंगांची गोडी अनुभवत टाळ, मृदंगाच्या ठेक्‍यावर चिमुकल्यांनी ताल धरला. तसेच वृक्षदिंडी, स्वच्छता मोहीम, मुली वाचवा आणि शिकवा यावर आधारित जनजागृती फेरी काढून जनजागृती करण्यात आली.

लहान वयात मुलांना वारीची परंपरा माहित व्हावी या उद्देशाने आषाढी एकादशी व गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन पालखी , ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खंडाळे गाव विठुनामाच्या जयघोषात रंगुन गेले होते. बालवारक-यांच्या या सोहळ्यात मग पालकही सहभागी झाले अन अवघी पंढरीच तिथे अवतरली. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी  व विविध  संत तसेच विठ्ठल रखुमाईच्या वेषात टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्‍यावर तुळस घेऊन पालखी सोहळ्यात उत्साहात सहभाग दर्शविल्यामुळे चिमुकल्यांची ही वारी आकर्षणाचा विषय ठरली. या वेळी हातात भगव्या पताका व डोक्‍यावर तुळस घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांना भक्‍ती भावात दंगताना पाहून गावकऱ्यांनीही त्यांचा उत्साह वाढविला. त्यांनीही मुलांमध्ये येऊन हरी नामाचा गजर केला.

दिंडीत मुलींनी डोक्‍यावर तुळशीची रोपे, कळशी घेऊन गावकऱ्यांना वृक्ष संवर्धनाचाही संदेश दिला. याप्रसंगी शिरुर तालुका खारेदी विक्री संघाचे अध्यक्ष  राजेंद्र नरवडे, खंडाळेच्या सरपंच विजया नळकांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश नरवडे, माजी सरपंच धर्मराज नरवडे,माजी उपसरपंच सुखदेव दरवडे, शहाजीबापू नळकांडे,पोलिस  पाटील पंडीत खेडकर, सदाशिव नरवडे, चंद्रकांत चातुर, मधुकर नरवडे, सदाशिव नरवडे दिनकर पडवळ, सुभाष  दरवडे, सुनिल हिंगे, अर्जुन दरवडे, बाळुनाना नरवडे, शहाजी नळकांडे तसेच सर्व शिक्षक,भजनीमंडळ यांच्यासह अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक माऊली तिरखुंडे,शिक्षक राजेंद्र चोरे,नाथु वीर, सखाराम बनकर, श्रीहरी नरवडे, शोभा लोंढे व कमल वीर यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या