विठ्ठलवाडीत स्वच्छता, प्लॅस्टिक बंदी जनजागृती फेरी

Image may contain: 5 people, people standing and outdoor
विठ्ठलवाडी, ता. 6 ऑगस्ट 2018 (एन.बी.मुल्ला): श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे स्वच्छता अभियान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी प्रभातफेरी काढून जनजागृती केली.

विठ्ठल वाडी (ता. शिरूर) येथे रविवारी (ता. 5) स्वच्छता सर्वेक्षण अभियानासाठी जनजागृती फेरी काढण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पांडुरंग विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणा देत प्लास्टिक बंदी विषयी व स्वच्छता अभियाना विषयी जनजागृती केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ग्रामसेवक डी टी नाथ यांनी सांगितले की ग्राम स्वछता अभियान २०१८ ची घोषणा केंद्र स्तरावरून करण्यात आली आहे.

१ ते ३० ऑगस्ट २०१८ या कालावधीत या अभियानाची अंमलबजावणी करावयाची आहे. यामध्ये गावात जाऊन समिती गावाचे थेट परीक्षण करणार असून यामध्ये शालेय स्वच्छता अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ  तसेच धार्मिक स्थळांची स्वच्छता या बाबी तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकांच्यात जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

२ ऑक्टोबर २०१८ गांधीजयंतीच्या दिवशी राष्ट्रीय स्तरावर ग्रामस्वच्छता पुरस्कारांचे वितरण होणार असून ग्रामस्वच्छता अभियानात सर्व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी होण्याचे आवाहनही ग्रामसेवक नाथ यांनी केली आहे. याप्रसंगी प्लास्टिक बंदी बाबतही  जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारे, माजी सरपंच अलका राऊत, दिलीप गवारे, माजी उपसरपंच बाबाजी गवारे, पांडुरंग विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सुरेश थोरात, कला शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रविण जगताप, जि.प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. एम. संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच ललिता गाडे, कौशल्या हंबीर, ज्ञानेश्वर राऊत, पोलीस पाटील शरद लोखंडे, चंद्रकांत गवारे, श्रीहरी गवारे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले तर किसन गवारे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या