युवकांनी ध्येयवादी असावे : बंडा जोशी

Image may contain: 8 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता.१८ अॉगस्ट २०१८ (प्रतिनीधी)  : यशाच्या उच्च शिखरावर जाण्यासाठी ध्येयवादी बनून महाविद्यालय जीवनात पायाभरणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह व प्रसिद्ध हास्यकवी बंडा जोशी यांनी केली.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भित्तीपत्रक व वांगमय मंडळाचे उद्घाटन बंडा जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे होते.

यावेळी बोलताना जोशी पुढे म्हणाले की सध्याच्या गतिमान व धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येकाला नैराश्‍याने ग्रासले आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनातील नकारात्मकता घालवायची असेल तर विनोदी साहित्याला पर्याय नाही. सखोल वाचन व सकारात्मक जीवनशैली हीच जीवनाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली असल्याचेही जोशी यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश ढमढेरे यांनी विविध आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याचे युवकांना आवाहन केले. महाविद्यालयीन जीवन हे आनंदाचे असते, तो आनंद घेता घेता भावी जीवनाची पायाभरणी देखील या वयात केली तर हमखास यश मिळते असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

ढमढेरे महाविद्यालयातील या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास ५७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्याचे संयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.पराग चौधरी, मराठी विभाग प्रमुख डॉ. संदीप सांगळे, प्रा. दत्तात्रय कारंडे, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. डी.सी. वाबळे, डॉ. अमेय काळे, डॉ. रवींद्र भगत, प्रा. भाऊसाहेब रवंदळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप सांगळे यांनी केले. प्रा. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सोमनाथ पाटील यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या