'वीस हजार रुपये दे नाही तर आम्ही तुझे हात-पाय तोडू'

Image may contain: 1 person, outdoor
शिक्रापूर, ता. 12 सप्टेंबर 2018: रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये जेवण पुरविणाऱया कंत्राटदाराला अडवून आम्हाला प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये दे नाही तर आम्ही तुझे हात-पाय तोडू, अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार दिलेली माहितीनुसार, कोंढापूरी (ता. शिरूर) येथील किर्लोस्कर कंपनीत सदानंद शेट्टी जेवण पूरवितात. शेट्टी या कंत्राटदारांचे व्यवस्थापक मनोज लायसे हे सोमवारी (ता. 10) रात्री साडेनऊच्या सुमारास कंपनीत जेवण पोहच करुन परत घरी येत होते. त्यांना अक्षय रोकडे, भुषण गायकवाड, सागर माघाडे, आकाश दंडवते (सर्व रा. कोंढापूरी, ता.शिरूर) व इतर दोघांनी अडवून जेवणाचे कंत्राट चालू ठेवायचे असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपये दे नाही तर आम्ही तुझे हात-पाय तोडू असे म्हणून सर्वजण निघून गेले.मंगळवारी सकाळी पुन्हा अकराचे सुमारास मनोज लायसे हे जेवण घेवून कंपनीत जात असताना पुन्हा वरील आरोपींनी त्यांना पुणे-नगर रस्त्यावरील मास्टर हॅंडर कंपनीजवळ अडविले व गाडीतले जेवण व जेवणाचे डबे असा एकूण साडेबारा हजाराचा मुद्देमाल आपल्या गाडीत टाकून, फिर्यादी लायसे व त्याचा सहकारी सुलतान व नंदू (पूर्ण नाव माहिती नाही) काढून घेवून मारहाण करण्यास सुरवात केली. वीस हजारांची लगेच मागणीही केली. सदर तक्रारीवरुन भूषण गायकवाड, अक्षय रोकडे, सागर माघाडे, आकाश दंडवते व इतर दोघे असे एकूण सहा जणांवर खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी सणसवाडीत पुणे-नगर रस्त्यावरील सर्व उद्योजकांची एक बैठक घेतली होती. तुम्ही फक्त तक्रारी करा, बाकी आम्ही पाहून घेतो असे सांगत औद्योगिक क्षेत्रातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना औद्योगिक क्षेत्राबाबत संवेदनशील राहण्याची सूचना केली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी आलेल्या तक्रारीवरुन थेट खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत औद्योगिक ठेक्यावरुन थेट दरोड्याचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असून, या पुढील काळात आपल्या हद्दीत औद्योगिक गुंडांसाठी हा सूचक इशारा असल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

रांजणगाव एमआयडीसीमध्ये धमकावण्याचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत. परंतु, आता थेट गुन्हाच दाखल झाल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या