तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Image may contain: 3 people, people standingतळेगाव ढमढेरे, ता. 14 सप्टेंबर 2018 (एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गायरान जागेत अतिक्रमण करून सुरू असलेले बांधकामा विरोधात तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडे या अतिक्रमाणाविरोधात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. 13) पासून बेमुदत उपोषण करून निषेध व्यक्त केला.          

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या समोर उपोषणाला बसण्याचा इशारा श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार माजी सरपंच महेंद्र पवार, सुधीर ढमढेरे, अशोक रासकर, संतोष ढमढेरे, विजय घुले, बाळासाहेब ढमढेरे, गणेश गुंड, पोपट ढमढेरे हे उपोषणास बसले आहेत. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायतीला दिलेल्या लेखी निवेदनानुसार संबंधित व्यक्तीने गायरान जागेतील तलाठी निवास पाडून तेथे पक्के बांधकाम करून खोटे दस्तऐवज तयार केले. सिटीसर्वे अधिकारी हाताशी धरून गायरान जमिनीत सिटी सर्व्हे नं. १४३० असा घालून खोटे दस्तऐवज तयार केलेले असून सरकारी दप्तरी त्याची नोंद केलेली आहे. सदर व्यक्तीच्या मृत्यूनंतर सन २०१० मध्ये वारस नोंद केलेली आढळून येत आहे. यामध्येही पत्नी, मुलगी, दोन मुले यांची नोंद सन २०११ मध्ये झालेली आहे. वास्तविक सदर जागेचा गट नंबर ४१७५/१अ असा असून त्यामध्ये 'सरकार' हे नाव आहे. तरीदेखील सिटी सर्व्हेला नोंद असल्याची सबब पुढे करत या गटांमध्ये कल्पना संजय गायकवाड या आरसीसी बांधकाम करत आहेत.

Image may contain: 2 people, people standing
सदरचा प्रकार महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ कलम २५७ प्रमाणे बेकायदेशीर व चुकीची आहे. सदरचे बांधकाम कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर चालू आहे. शासकीय अधिकारीही या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. उपोषणस्थळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, माजी ग्रामपंचायत सदस्या कविता मावळे, नवनाथ कांबळे, काकासाहेब जेधे, संदीप ढमढेरे, सुनील ढमढेरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून उपोषणाला पाठिंबा दर्शवला. यावेळी बोलताना अरविंदादा ढमढेरे यांनी सांगितले की या प्रकरणातील दोषींवर व भ्रष्ट अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमणे काढणे जमत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. तर महेंद्र पवार यांनी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन अतिक्रमणे काढण्याचा व अनधिकृत बांधकाम पाडण्याचा ठराव करावा अशी मागणी करून गावचे लचके तोडणाऱ्या लांडग्याविरुद्ध हे उपोषण असल्याचे सांगितले. दरम्यान शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी उपोषणस्थळी भेट देऊन यातून मार्ग काढला जाईल व दोषीवर कारवाई करण्यात येईल असे उपोषण करतांना सांगितले मात्र उपोषण करते ठोस निर्णय होईपर्यंत उपोषणावर ठाम आहेत

अनधिकृत बांधकामसंदर्भात कल्पना संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ही जागा आमच्या मालकीचीच असून १९७१ ला सिटी सर्व्हेला तशी नोंद आहे. गायराणाच्या जमिनीशी आमच्या जागेचा कांहीही संबंध नाही.

तळेगाव ढमढेरे येथील गट नंबर ४१७५/१अ मधील अनाधिकृत बांधकामासंदर्भात सोमवार (ता. १७) सप्टेंबर रोजी ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सिटीसर्वेचे अधिकारी, गटविकास अधिकारी, उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधी व स्वतःच्या मालकीची जागा असल्याचा दावा करणाऱ्या कल्पना गायकवाड यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करणार असून सर्व कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतर सिटीसर्वेच्या अधिकाऱ्याशी सिटीसर्वेला झालेल्या नोंदीबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- रणजीत भोसले, तहसीलदार, शिरूर.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या