होमाचीवाडीकर चार दिवसांपासून अंधारात

Image may contain: sky, cloud, plant and outdoorतळेगाव ढमढेरे,ता१७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी)  : शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा गावातील होमाचीवाडी येथील विद्युत रोहित्र  जळाल्याने येथील नागरिक ४ दिवसापासून अंधारात आहेत. सबंधित वीजवितरण विभागाचे अधिकारी मात्र मुग गिळून गप्प बसले असून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

टाकळी भिमा (होमाचीवाडी )येथील विद्युत रोहित्र गणपती बाप्पाच्या आगमनादिवशी नादुरुस्त झाले असून ४ दिवस होऊनही अद्याप  वीजवितरण विभागाचे अधिकारी कसल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नसल्याचे चित्र असून नागरिक व शेतकरी मात्र हवाईदिल झाले आहेत. याच विद्युत रोहित्रावरून होमाचीवाडी व पाचर्णेवस्ती येथील नागरिकांना विद्युत पुरवठा असल्याने येथील नागरिकांची  पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.

शिरूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना विजेच्या मोटारीच्या साहाय्याने पाण्याचा उपसा करून शेतीला पाणी द्यावे लागते परंतु विजेचा पुरवठा खंडित झाल्याने शेतीच्या तसेच जनावरांसाठी आवश्यक पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. विजवीतरण विभागाच्या गलथान कारभाराचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

यासंदर्भात तळेगाव ढमढेरे येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता बी.ए.अलदार यांच्याशी संपर्क साधला असता होमाचीवाडी येथील रोहित्र जळाले असल्या बाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला असल्याचे त्यांनी सांगितले तर विद्युत पुरवठा कधी सुरू होईल हे मात्र त्यांना सांगता आले नाही त्यामुळे नागरिकांना अजून किती दिवस अंधारात राहावे लागणार हे  काळच ठरवेल.  वास्तविक टाकळी भिमा येथील होमाचीवाडी रोहित्रावर जास्त वीजभार आल्यामुळे सतत हे रोहित्र नादुरुस्त अवस्थेत असते.

गेल्यावर्षी तर येथील नागरिकांना तब्बल १३ दिवस अंधारात राहावे लागले होते. या रोहित्रावरील भार कमी केल्यास या घटनेला आळा बसेल त्यासाठी  पाचार्णेवस्ती येथे स्वतंत्र रोहित्र बसवण्याची मागणी येथील नागरिकांनी वारंवार केली आहे. मात्र या मागणीकडे महावितरण जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने येथील नागरिकांनी महावितरणच्या काराभरावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून नाराजी व्यक्त केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या