महसूल विभागाला घाबरत नाहीत वाळू सम्राट (Video)

Image may contain: sky, ocean, cloud, outdoor, nature and water
शिरूर, ता. 27 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अनेक भागात वाळूच्या ठेक्याचे लिलाव झाले नसतानाही दिवसरात्र बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालूच आहे. महसूल विभागाने अनेक वेळा कारवाई करुनही "वाळूसम्राट"घाबरत नसून घोडनदीच्या पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे.

घोडनदी पात्रात दाणेवाडी, पिंपळाचीवाडी येथे बेसुमार वाळू उपसा चालू आहे. या व्यवसायातले मातब्बर लोक स्थानिक युवकांना हाताशी धरुन रात्रंदिवस वाळू उपसा करत असून पिंपळाचीवाडी येथे घोड नदीपात्रात सुमारे २५ बोटीद्वारे वाळूउपसा करुन त्याचा परिसरातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत मोठया प्रमाणात साठा करुन तो रात्री वाहतुक केला जात आहे. त्यामुळे येथे वाळूसाठी प्रचंड चढाओढ आणि स्पर्धा सुरू झाली आहे. वाळूच्या ठेक्यासाठीच काही दिवसापुर्वी मारामारीही झाली होती. परंतु इथं एवढा सावळा गोंधळ सुरू असताना सगळ्याच राजकीय पक्षाचे पुढारी मात्र काहीही बोलायला तयार नाहीत. महसूल विभागाने काही दिवसांपुर्वी येथे छापा टाकुन कारवाई केली होती. परंतु लगेच दुसऱ्याच दिवशी परत वाळू उपसा चालु झाला.त्यामुळे वाळू उपसा करायला राजकीय वरदहस्त आहे की काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

सध्या येथे अनेक शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत वाळूचे ढिगच ढिग दिसत आहेत. मोठया प्रमाणात वाळूचा साठा करण्यात येत आहे. शासनाचा एवढया मोठया प्रमाणात लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसुल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

याबाबत बोलताना शिरुरचे तहसीलदार रणजित भोसले म्हणाले, "पिंपळाचीवाडी येथे ज्या स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात वाळू साठा सापडला त्यांच्यावर यापुर्वी आम्ही कारवाई केली आहे. परंतु ज्या जमिनीत वाळू साठा होता. त्या जमिनीचे मालक मयत झालेले होते. तसेच त्या जमिनीत कोण वाळूचा साठा करतंय हे स्थानिक लोक सांगत नाहीत त्यामुळे नक्की कारवाई कोणावर करायची असा मोठा प्रश्न निर्माण होतो. स्थानिक लोकांची एकमेकांशी मिलीभगत असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कारवाईला गेल्यास वाळूसम्राट बोटी नदीपात्रातुन श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत पळवुन नेतात त्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या