शिरूरमध्ये सापळा लावून दरोड्यातील दोघांना केली अटक

Image may contain: 11 people, people standing
लोणीकंद, ता. 13 ऑक्टोबर 2018: डोंगरगाव (ता. हवेली) येथे 17 सप्टेंबर रोजी पहाटे गडदेवस्तीवर पडलेल्या दरोड्यातील दोघा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 12) शिरूरमध्ये सापळा लावून अटक केली.

अर्चना उदाश्‍या भोसले व शेखऱ्या उदाश्‍या भोसले (दोघे रा. रांजणगाव मस्जिद, ता. पारनेर, जि. नगर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना शिरूर बस स्टॅंडवर सापळा लावून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.

डोंगरगाव येथे 17 सप्टेंबरला पहाटे गडदेवस्तीवर केरबा भिवा गडदे (वय 65) यांच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून गडदे व त्यांच्या पत्नी मुक्ताबाई यांना मारहाण करून नथ व मंगळसूत्र जबरीने चोरून नेले होती . या वेळी मारहाणीत केरबा गडदे हे ठार झाले, तर मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खून व दरोड्यासह इतर गुन्हे दाखल करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व लोणीकंद पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला.

या दरम्यान मिळालेल्या बातमीनुसार हा गुन्हा पिन्या अंकुश काळे (रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर, जि. नगर) याच्या टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. या दरोड्यात चोरलेली सोन्याची नथ विक्रीकरिता शिरूर बस स्टॅंडवर आलेल्या अर्चना भोसले व शेखऱ्या उदाश्‍या भोसले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एक सोन्याची नथ व मोबाईल मिळाला. तसेच चौकशीत व तांत्रिक तपासात हा गुन्हा शेखऱ्या उदास्या भोसले, पिन्या अंकुश काळे, सागर अंकुश काळे, अजय जयश्रा काळे, अतुल जयश्रा काळे, कच्या लाईदऱ्या काळे (सर्व रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर, अहमदनगर), गिल्या ऊर्फ लंगड्या रम्या काळे (रा. कोळगाव, श्रीगोंदा, अ. नगर), अर्चना उदाश्‍या भोसले (मदतनीस) या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले.

यात पिन्या काळे (16), सागर काळे (5), कच्या व अतुल काळे (2) गुन्हे दाखल असून पुढील कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिले आहे. या तपासकामी लोणीकंदचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर व त्यांच्या पोलिस पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, मांजरे, दत्ता गिरमकर, एच. सी. जावळे, बांबळे, राजू मोमीन, पोपट गायकवाड, साबळे, नवले यांच्यासह पोलिस मित्र योगेश नवले यांचीही मदत झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या