मांडवगणमध्ये ट्रॅक्टरने उसतोड मजुराच्या मुलीला चिरडले

No automatic alt text available.मांडवगण फराटा, ता. २५ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील जगतापवाडी नजीक भरघाव वेगाने जात असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून उसतोडणी मजुराची तीन वर्षाची बालिका ठार झाली.

अश्विनी प्रल्हाद माळी असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. हा अपघात बुधवार (दि.२४) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरला वाळूने भरलेले दोन ट्रेलर जोडून वाळू वाहतूक करत होता. अश्विनी ही पाणी आणण्यासाठी चाललेल्या आईच्या बोटाला धरून रस्त्याच्या कडेने जात असताना पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का मायलेकींना लागला. यामध्ये अश्विनी ट्रेलरच्या चाकाखाली आली, तर आई गीता रस्त्याच्या खाली पडली. या दुर्घटनेत अश्विनीच्या डोक्यावरून चाक गेल्याने कवटी फुटून मेंदू बाहेर पडला होता. अपघातातील ट्रॅक्टर लाल रंगाचा असून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रेलरवर नंबर नाहीत.

या प्रकरणी मुलीची आई गीता प्रल्हाद माळी (रा. घसूरतांडा, ता. कन्नड जि. औरंगाबाद, सध्या राहणार, जगतापवाडी, मांडवगण फराटा, ता. शिरूर) यांनी याबाबत मांडवगण पोलीस चौकीत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेप्रकरणी मांडवगण पोलिसांनी ट्रॅक्टरचालक महेश बबन नाईकवडे याला ताब्यात घेतले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या