रांजणगावात एमआयडीसीत रॉड पडून कामगाराचा मृत्यू

Image may contain: 1 personरांजणगाव गणपती, ता. 31 ऑक्टोबर 2018: रांजणगाव एमआयडीसीतील व्हील्स इंडिया कंपनीत मशिनचा गिअर बॉक्‍स फुटून रॉड डोक्‍यात पडल्याने अनिल बाबूराव पडवळ (वय 42, रा. गोलेगाव, ता. शिरूर) या कामगाराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अरुण केंद्रे (रा. जोशीवाडी, शिरूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (ता. 30) सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुलदिप गोपिनाथ वाखारे(रा.गोलेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पडवळ व अरुण केंद्रे हे "व्हील्स इंडिया प्रा. लि'मध्ये प्रेस शॉपमध्ये सकाळी सातपासून काम करीत होते. ते काम करीत असलेल्या मशिनच्या वरील बाजूसही एक मशिन असून तीही सुरू होती. सकाळी पावणेआठच्या सुमारास वरील मशिनच्या गिअर बॉक्‍समध्ये आवाज होऊन तो फुटला. त्यातील लोखंडी पार्ट व तुकडे खाली काम करत असलेल्या पडवळ व केंद्रे यांच्या अंगावर पडले. दोघांच्याही डोक्‍यात हेल्मेट होते. तरीही गिअर बॉक्‍समधील लोखंडी दात्र्यांचे चक्र पडवळ यांच्या डोक्‍यात पडले. त्यामुळे हेल्मेट फुटून त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला. शेजारीच काम करणारे केंद्रे यांच्या अंगावरही गिअर बॉक्‍समधील काही तुकडे पडल्याने तेही गंभीर जखमी झाले. कंपनीतील कामगारांच्या मदतीने दोघांना शिरूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच पडवळ यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

अनिल पडवळ यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अनिल हे गोलेगाव व शिरुर परिसरात चांगल्या स्वभावाने परिचित होते. त्यांच्या घटनेची वार्ता दिवाळीच्या तोंडावर समजताच शिरुर शहर व गोलेगाव परिसरात शोककळा पसरली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या