पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडीने होतोय मनस्ताप

Image may contain: one or more people and outdoor
शिक्रापूर, ता. 5 नोव्हेंबर 2018 (एन. बी. मुल्ला): येथील चाकण चौकात व पाबळ चौकात वाहतुकीची कोंडी होऊन नेहमीच वाहतुक ठप्प होत आहे. चाकण चौकातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचा तर नेहमीच बोजवारा उडालेला असतो. त्यामुळे परीसरातील नागरीकांना व वाहतूकदारांना तास तासभर ताटकळत थांबावे लागते. गेल्या दोन दिवसात तर शिक्रापूर पासून सणसवाडी पर्यंत वाहतूक कोंडी होवून सुमारे 4 किमी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवासी, वाहतुकदार व परीसरातील नागतीकांना तासनतास ताटकळत थांबावे लागल्याने मोठया प्रमाणात मनस्ताप झाला.

पुणे-अहमदनगर महामार्गावर भरधाव वेगाने वाहने असतात. चाकण, रांजणगाव गणपती व सणसवाडी औद्योगिक क्षेत्रामुळे चाकण-शिक्रापूर मार्गावर अवजड वाहनांची वाहतुक सुरू असते. चाकण-शिक्रापूर-नगर मार्गावर अवजड वाहणे व कंटेनर यांना सायंकाळी सहा नंतरच रस्त्यावरून वाहतूकीस परवानगी असताना नियम धाब्यावर बसवून अनेकदा दिवसा अशी वाहने रस्त्यावर दिसत असल्याने मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.

शिक्रापूर-चाकण मार्ग हा मुंबर्इला जाण्यासाठी जवळचा बायपास मार्ग असल्याने सोलापूर महामार्गावरील मुंबर्इच्या दिशेने जाणारी व येणारी मालवाहू वाहने चौफुला-न्हावरा-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर-चाकण या मार्गानेच जात असल्याने शिक्रापूर येथील चाकण चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते व वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात तर मध्येच कांही वाहने आडवी तिडवी आल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन ताटकळत थांबावे लागते. भरीत भर म्हणून ऊस वाहूतूक करणारे  ट्रॅक्टर-ट्रेलरमुळे वाहतुक कोंडीत वाढच होत आहे.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस असतात. परंतु, वाहनांच्या वर्दळीमुळे पोलीसांनाही वाहतुक कोंडी रोखता येत नाही. अशीच स्थिती येथील पाबळ चौकातही होत आहे. मोठया प्रमाणात होणाऱया या वाहतूक कोंडीमुळे अपघातग्रस्त रूग्णांना रूग्णवाहीकेतून पुण्याला नेताना प्राणदेखील गमवावे लागण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत.

प्राशासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून पुणे-नगर मार्गावरील शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौकातील वाहतुक सुरळीत करणे आवश्यक आहे.  त्यासाठी येथील चाकण चौकातील सिग्नल यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्याची व पाबळ चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचे तुमचे अनुभव प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर लिहा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या