'लष्करामध्ये कोणत्या पुढाऱयाचा मुलगा आहे का?'

आंधळगाव, ता. 19 नोव्हेंबर 2018 (प्रमोल कुसेकर) : सैन्यामध्ये कोणत्याही पुढाऱ्यांचा मुलगा गेलेला कुठे पाहिला आहे काय? सैन्यामध्ये मुख्यत्वे गरीबाची मुले गेलेली आहेत. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे माजी जवान कल्याण व कृषि राज्यमंञी दादा जाधव यांनी म्हटले आहे.

आंधळगाव (ता. शिरुर) येथे भारत मातेच्या रक्षणाकरिता प्राणाची बाजी लावलेल्या जवान प्रदिप सरोदे यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हुतात्मा प्रदिप सरोदे प्रतिष्ठाणच्या वतीने शिरूर तालुक्यातील २७ जिल्हा परिषद व प्राथमिक शाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षिस वितरण सोहळा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना दादा जाधवराव म्हणाले कि, सध्या जवानांमुळे देश सुरक्षित आहे. परंतु आताचे महाराष्ट्राचे जवान कल्याण मंञी कोण आहेत हे जनतेला तरी माहीत आहे का ? असा सवाल निर्माण होतो. आतापर्यंत मी माझ्या कार्यकाळात ६ ते ७ टोलनाके माजी जवानांना मिळवून दिले असून ते अत्यंत चांगल्या प्रकारे चालवत आहेत. हुतात्मा जवानाच्या गावामध्ये ताम्रपञ बनविण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. सैन्यामध्ये कोणत्याही पुढाऱ्यांचा मुलगा गेलेला कुठे पाहिला आहे काय? सैन्यामध्ये मुख्यत्वे गरीबाची मुले गेलेली आहेत. त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शशिकांत दसगुडे, घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, औरगांबादच्या पोलिस अधिक्षक प्रिया थोरात, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, कर्नल मिलिंद तुंगार, कर्नल डी. के. गोयल, शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी जवान कल्याण व कृषि राज्यमंञी दादा जाधवराव आदींची भाषणे झाली. देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या शिरुर तालुक्यातील जवानांच्या  परिवारातील वीर पत्नी व माता पित्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

वन रँक वन पेंशन हा मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय असून, त्याचा अनेक जवांनाना फायदा झाला आहे. शिरुर तालुक्यातील जवानांचे गाव असलेल्या गोलेगाव येथे जवानांसाठी मोठा हॉल बांधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जवानांचा एकप्रकारे सन्मान होणार आहे, असे मत शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी व्यक्त केले.

पुणे हि शुरवीरांची भुमी असून, येथील मुलांना याच ठिकाणी योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. समाजाने हुतात्मा झालेल्या जवांनाच्या वीरपत्नी व कुटुंबियांसोबत रक्षाबंधन व अन्य सन साजरे करावेत. माजी जवानांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. जवानाच्या कुटुंबीयाना शिक्षणसाठी आरक्षण दिले असून त्यांचा फायदा त्यांनी घ्यायला हवा. शासनाने शहीद कुटुंबियांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांना घरे, जमिनी व गँस परवाने आदी योजनाचा लाभ द्यावा. हे स्मारक रस्ता रुंदीकरणात जात असून, त्याचा विचार करावा, असे मत जिल्हा जवान कल्याण अधिकारी कर्नल मिलिंद तुंगार यांनी व्यक्त केले.

यावेळी उर्जा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ, दादापाटील फराटे, घोडगंगाचे संचालक सुदाम साठे, पंचायत समिती सदस्या प्रतिभा शेलार, संभाजी धुमाळ, दत्ताञय खंडागळे, कैलास सोनवणे, एकनाथ शेलार, सुधीर शितोळे, पञकार नितीन बारवकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके, वीरपिता सुधाकर सरोदे, वीरपत्नी कांचन सरोदे , बापुसाहेब सरोदे, शिरुर तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

स्वागत सागर सरोदे यांनी केले, सुञसंचालन संजय बारवकर, कल्याणी जगताप यांनी केले. प्रास्तविक बी.जी, पाचर्णे यांनी केले. आभार संदेश सरोदे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या