स्वच्छ ग्राम योजने अंतर्गत जिल्हा पथकाद्वारे विठ्ठलवाडीची पाहणी

विठ्ठलवाडी, ता. 20 नोव्हेंबर 2018: शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी गावची स्वच्छ गाव व स्वच्छ तालुका पारितोषिक योजने अंतर्गत जिल्हास्तरावरील तपासणी पथकाने पाहणी केली व स्वच्छतेसंदर्भात समाधान व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ गाव व स्वच्छ तालुका पारितोषिक योजनेतील जिल्हास्तरावरील तपासणी पथकाने श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी या गावची दौंड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मारुती इंगळे  यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने पाहणी केली.

यावेळी शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.के.शिंदे सरपंच ललिता गाडे, उपसरपंच जयेश शिंदे, माजी उपसरपंच बाबाजी गवारे, दिलीप गवारे, ग्रामसेवक दादासाहेब नाथ पोलिस पाटील शरद लोखंडे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्रीकांत ढमढेरे, शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, नवनाथ गवारे, रघुनंदन गवारे, संदीप गवारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वच्छता पथकाने श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प, संत निळोबाराय उद्यान, भीमा नदी परिसर स्वच्छता  व स्मशानभूमी परिसराची पाहणी केली.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील ३९ गावांची १३ पाहणी पथकांच्या माध्यमातून ही स्वच्छता तपासणी मोहीम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ गाव व स्वच्छ तालुका पारितोषिक योजनेतील शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी, बुरूंजवाडी, सरदवाडी आदी गावांचा समावेश आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या