सादलगाव ग्रामसभेत ग्रामसेविका बदलीचा ठराव

सादलगाव, ता. 22 नोव्हेंबर 2018 (संपत कारकूड): ग्रामसभेमध्ये ग्रामसेविका राणी साबळे यांच्या बदलीचा ठराव झाला आला असून, कामावर येण्याचा अनियमितपणा व गैरहजेरीमुळे येथील नागरिकांनी हा ठराव करुन घेतला आहे. मंगळवारी (ता. 20) ग्रामसभा पार पडली.

ग्रामपंचायतीमधील चार सदस्यांनी मिळून वरील ग्रामसेविकेविरुध्द गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. मनमानी कारभार करणे, सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, मागासवर्गीय महिला सदस्यांना अपनास्पद वागणूक देणे इत्यादी आरोप त्यांच्यावर झाले होते. सदर प्रकरामध्ये गटविकास अधिकाऱयांनी एक मिटिंगही घेतली होती. परंतु, ग्रामसेविकेच्या चुका पाठीशी घालून त्यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न दस्तुरखुद गटविकास अधिकाऱयांकडुन झाल्याचा आरोप वरील चार सदस्यांनी केला होता.

ग्रामपंचायत सदस्या सौ. रुक्मिणी अडसूळ यांनी ग्रामसेविका रसाळ यांची गेली दोन महिन्यापासून कामावर येण्याच्या हजेरीची व येण्याच्या वेळांची नोंद घेतली होती. 30 दिवसांमध्ये एकूण 10 दिवसच ग्रामसेविका आपल्या कामावर आलेल्या त्यांना दिसून आल्या. त्यांनी ठेवलेली हजेरीपत्रकासह माहिती ग्रामसभेमध्ये दाखवून त्यांच्या कामाजावर शंका निर्माण केली होती. तसेच ज्या दिवशी त्या कामावर होत्या त्या दिवशी त्या दुपारी कार्यालयामधून निघून गेल्याचेही अनेकदा आढळून आले होते. या सर्व प्रकारांमुळे येथील नागरिकांचे तसेच 14 व्या वित्त आयोगातील अर्धवट राहिलेली बहुतांश कामे मागे पडली आहेत. ग्रामसेविकेचे सहकार्य मिळत नसल्याने आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले असे सौ. अडसूळ यांनी ग्रामसभेमध्ये सांगितले.

दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतचा शुध्द पाण्याचा प्लॅन्ट किरकोळ कारणांमुळे बंद होता. यामध्येही ग्रामपंचायत पातळीवर प्लन्ट दुरुस्तीसाठी घ्यावयाच्या पुढाकार व प्रयत्न ग्रामपंचायतीने घेतले नसल्यामुळे नागरिकांनी याचाही जाब सरपंच व ग्रामसेविका यांना विचारला होता. यावर सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱयांमध्ये हमरीतुमरी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तंटा होता-होता टाळला. शेवटी वादामध्येच ग्रामसभा समाप्त करण्यात आली.
क्रमशः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या