मांडवगणमध्ये चाकू हल्ल्यात सख्खे भाऊ जखमी

मांडवगण फराटा, ता. 27 नोव्हेंबर 2018: मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील गायकवाड मळा येथे एका तरुणाने दोन सख्ख्या भावांवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले आहे. ही घटना रविवारी (ता. 25) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

मांडवगण फराटा येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश सोनवणे व नितीन फराटे यांच्यामध्ये आर्थिक देवाण घेवाण होत होती. सुरेश सोनवणे यांनी आरोपीकडून तीस हजार रुपये पाच महिन्यांकरिता दहा हजार रुपये जादा देण्याच्या बोलीवर घेतले होते. दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांनी आरोपीला चाळीस हजार रुपये पंधरा दिवसांपूर्वी दिले होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे सोनवणे यांनी आरोपी नितीन फराटे याच्या क्रेडिट कार्डवर दोन दिवसांपूर्वी ऑमनोरा मॉल मगरपट्टा सिटी येथे एकवीस हजार रुपयांची खरेदी केली होती. ही खरेदी केलेली रक्कम मागण्यासाठी संशयित आरोपी नितीन फराटे हा फिर्यादी यांच्या घरी ओंकार अंकुश फराटे याला सोबत घेऊन गेला होता. यावेळी पैसे मागत त्याने सुरेश सोनवणे यांच्या पोटाला चाकू लावल्याने पोटाला जखम होऊन रक्त येऊ लागले होते. हा प्रकार पाहून सुरेश शहाजी सोनवणे यांचे मोठे बंधू महादेव शहाजी सोनवणे (वय 33) हे मदतीसाठी धावले असता आरोपी नितीन फराटे याने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही गंभीर जखमी केले. दोन्ही भावांवर प्राथमिक उपचार करुन लोणी काळभोर येथे विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची फिर्याद सुरेश शहाजी सोनवणे (वय 31 वर्षे, राहणार मांडवगण फराटा) यांनी दिली आहे. पोलिसांनी चाकू हल्ला करणारा संशयित आरोपी नितीन नारायण फराटे (राहणार मांडवगण फराटा) याच्यावर गुन्हा दाखल करून घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या