विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच संविधान अभ्यासावे: शिंदे

तळेगाव ढमढेरे, ता. 28 नोव्हेंबर 2018: विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच संविधान अभ्यासावे, असे आवाहन विद्याधाम प्रशालेचे उपप्राचार्य रामदास शिंदे यांनी केले.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेत संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपप्राचार्य शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे होते.

रामदास शिंदे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात अथक परिश्रम घेऊन देशाचे महान संविधान तयार करून ते राष्ट्राला समर्पित केले. त्यामध्ये त्यांची विद्वत्ता, कठीण परिश्रम, चिकाटी, राष्ट्रप्रेम, या सर्व घटकांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेले संविधान प्रत्येक भारतीयाला खऱ्या अर्थाने सक्षम बनवते. भारतीय संविधान हे जगामध्ये आदर्श असून प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा हेवा वाटावा असेही शिंदे म्हणाले. प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे यांच्या हस्ते संविधानाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य व्यवहारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ दिली. तसेच २६/११ या दिवशी मुंबई येथे पाकिस्तानातील अतिरेक्यांनी ताज हॉटेलवर व इतर ठिकाणी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कुंभार यांनी केले तर प्रा. दिगंबर नाईक यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या