राष्ट्रवादी लोकसभेसाठी 'या' नावांमधून कोणाला देणार संधी?

शिरूर, ता. 30 नोव्हेंबर 2018: शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. संभाव्य नावांमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, देवदत्त निकम आदींचा समावेश आहे. आता राष्ट्रवादी यापैकी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे.  

जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. 29) कार्यकर्ता मेळावा व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुळे यांनी तालुका बूथ कमिटीचा आढावा घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

शिरूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाला गेल्या तीन निवडणुकांत सलग पराभव स्वीकारावा लागला. येथे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार हा निवडणुकीच्या किमान तीन-चार महिने आधी जाहीर करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे आता या वेळी पक्षाने तसा निर्णय घेतल्याचे सुळे यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.

शिरूर लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला तीन निवडणुकांमध्ये पराभावाला सामोरे जावे लागले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपणच या निवडणूकीत विजयी होणार, असे ठामपणे सांगत आहेत. राजकीय वातावरण तापू लागले असून, लोकसभेची विजयी पताका कोणाकडे जाणार हे काळच ठरवणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या