कोरेगाव भीमा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई, ता. 1 डिसेंबर 2018: कोरेगाव भीमा आणि मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली. मात्र, पोलिसांवरील हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे मागे न घेण्यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल 543 गुन्ह्यांपैकी गंभीर 46 गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच भिमा- कोरेगाव दुर्घटनेच्या अनुषंगाने दाखल 655 गुन्ह्यांपैकी 63 गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 31) विधानसभेत सांगितले.

मराठा आंदोलनादरम्यान राज्यभरात 543 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 66 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया (ए- फायनल) अंतिम टप्प्यात आहे. चार्जशीट दाखल केलेल्या 117 गुन्ह्यांच्या प्रकरणात ते मागे घेण्यासंदर्भात (ए-फायनल) कोर्टाकडे शिफारस पाठविल्या आहेत. तपास सुरु असलेल्या 314 प्रकरणात चार्जशीट दाखल करुन ते परत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून तेही ‘ए-फायनल’ होतील. मात्र, 46 प्रकरणांमध्ये पोलीसांवरील हल्ले आदी बाबतचे सीसीटीव्ही चित्रिकरण आदी सबळ पुरावे उपलब्ध असल्याने  ते परत घेतले जाऊ शकत नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरेगाव भीमा दुर्घटनेनंतर उमटलेल्या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने 655 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 159 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. 275 मध्ये चार्जशीट दाखल झाले होते. ती 275 प्रकरणे मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 158 प्रकरणे तपासांतर्गत असून त्यातही चार्जशीट दाखल करुन मागे घेण्याची कार्यवाही होईल. 63 गुन्ह्यांमध्ये पोलीसांवरील हल्ले व इतर अनुषंगाने सबळ पुरावे उपलब्ध असल्याने ते मागे घेतले जाऊ शकत  नाहीत.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान राज्यभरात झालेल्या आत्महत्यांच्या अनुषंगाने सभागृहाला माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'भावनेच्या भरात आपल्या मागण्यांसाठी आजची तरुणाई आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. आत्महत्या केल्या तरच मागण्या मान्य होतात व त्याच्याच पाठीशी सरकार उभे राहते असा संकेत जाणे योग्य होणार नाही. तथापि, या आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देणे आवश्यक असून निश्चितपणे मदत केली जाईल.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या