विठ्ठलवाडीचे ऋषीकेश गवारे एनडीएच्या परीक्षेत उत्तीर्ण

Image may contain: 1 person, hat and textविठ्ठलवाडी, ता. 2 डिसेंबर 2018: श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील ऋषीकेश तुकाराम गवारे याने राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेत यश मिळविले आहे. ऋषीकेशची 2016 मध्ये १३५व्या तुकडीसाठी निवड झाली होती. तीन वर्ष चिकाटीने खडतर प्रशिक्षण पुर्ण करून तो उत्तीर्ण झाला आहे.

गवारे याचे शिक्षण पुणे येथे झाले असून, त्याच्या घरातील लष्करी शिस्त असल्यामुळे त्यालाही भारतीय सैन्यदलात काम करण्याची तीव्र इच्छा होती. त्याचे वडील तुकाराम गवारे हे भारतीय सैन्यदलात ११६ पायदळ तुकडीचे सेकंड इन कमांड या पदावर राजौरी, श्रीनगर येथे सध्या कार्यरत आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून येथील परीक्षा घेतली जाते. ऋषीकेश याने आपले आजोबा बबन गवारे यांच्याकडून शिस्तबद्धता, एकी, जिद्द व चिकाटीची प्रेरणा घेतली आहे. आजी लक्ष्मी गवारे यांच्याकडून अपार कष्ट, खरे वागणे, आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शिकवण घेतली आहे. आई भाग्यश्री यांनी त्यास संस्काराचे धडे दिले. ऋषीकेशने लहानपणापासूनच सैन्यदलात अधिकारी होण्याचे मनात ठाम केले, त्यासाठी त्याने अपार कष्ट व मेहनत घेतली. तीन वर्षांचे एनडीएचे खडतर शिक्षण घेतले. ऋषीकेश आर्मी कॅडेट असल्यामुळे इंडीयन मिलीटरी अॅकॅडमीत जाणार असून, त्यानंतर भारतीय लष्कराच्या पायदळात दाखल होणार अल्याचे ऋषीकेशने सांगितले.

विठ्ठलवाडीमधून लहान वयात केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या वतीने राष्ट्रीय प्रबोधिनीचा (एनडीए) अभ्यासक्रम पुर्ण करून ऋषीकेश हा गावातील पहिला मानकरी ठरला आहे. परिसरामधून ऋषीकेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या