शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकऱयाची आत्महत्या

Image may contain: 1 person, closeup
वडनेर, ता. 5 डिसेंबर 2018: शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून शेतकऱयाने शेतीसाठी आणलेले कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. राजेंद्र नाथा निचीत (वय 40) या शेतकऱ्याचे नाव आहे.

शेतमालाला मिळत नसलेला बाजारभाव व आर्थिक अडचणी यामुळे निचीत यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. कीटकनाशक पिल्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

पत्नी शोभा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती राजेंद्र हे शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे चिंतेत असत. शेतमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने त्यांनी नैराश्‍यातून शेतासाठी आणलेले कीटकनाशक पिऊन टाकले. चुलत भाऊ मच्छिंद्र यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना त्वरित मंचर येथील शासकीय रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविले. या वेळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. निचीत यांना दोन एकर जमीन आहे. शेतामध्ये घेतलेल्या पिकाला बाजारभाव नसल्याने त्यांच्यामध्ये नेहमीच नैराश्‍य होते. याबाबत निचीत यांना शासकीय मदत मिळवून देऊ, असे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या