शिरूरमध्ये दुष्काळाची स्थिती भीषण; जनावरांचे हाल

Image may contain: one or more people, people standing, outdoor and nature
शिरूर, ता. 7 डिसेंबर 2018: शिरूर तालुक्‍यात दिवसेंदिवस दुष्काळी स्थिती भीषण होत चालली आहे. जनावरांचा चारा व पाण्याअभावी हाल होत आहेत. भाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी बियांणाची पेरणी करून चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

शिरूर तालुक्‍यात साधारण 99 हजार 212 इतकी गाई व म्हैसवर्गातील दुभत्या जनावरांची संख्या आहे. शेळी-मेंढी वर्गातील जनावरे साधारण 81 हजार 262 इतकी आहेत. गाय आणि म्हैस वर्गातील एक वर्षापर्यंत वयाची लहान जनावरे साधारण 24 हजार 803 इतकी आहेत. या सर्व जनावरांना दैनंदिन 2122 टन चारा आवश्‍यक असून, तूर्तास जेमतेम स्थितीत जनावरांना हा चारा उपलब्ध होत असला, तरी पुढील अगदी काही दिवसांतच ही स्थिती गंभीर स्तरावर येऊन पोचणार आहे. शासकीय चारापुरवठा अगदी तातडीने सुरू होण्याची गरज आहे. या सर्व पशुधनास दैनंदिन 46 लाख 65 हजार लिटर पाणी अपेक्षित आहे. चाऱ्यासारखीच पाण्याचीही स्थिती अगदी गंभीर वळणावर असून, टॅंकरने पाणीपुरवठा तातडीने व्हावा अशी मागणी तालुक्‍यातील प्रत्येक गावातून आहे.

शिरूर तालुका दुष्काळसदृश म्हणून जाहीर झाल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक पासांमध्ये 100 टक्के सवलतीचा लाभ मिळत आहे. विद्यार्थी मोफत पासची संख्या तीन हजार एवढी असल्याचे एसटी आगाराच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिरूर तालुक्यात सध्या 8 टॅंकरने सहा गावांना पाणीपुरवठा होत असले तरी टॅंकरची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. शिरूर तालुक्‍यातील एकूण 119 महसुली गावांमध्ये एकूण पाणी योजना 136 आहेत, तर त्यातील बंद पाणी योजनांची संख्या जवळपास निम्म्यावर आलेली आहे. एकूण 1570 एवढ्या विंधन विहिरींपैकी 800 विंधन विहिरी पूर्ण बंद असून, उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भाग दुष्काळी भाग म्हणून जाहीर झाला असून आठ टॅंकर मंजूर झाले आहेत. लोकसंख्येनुसार या टॅंकरच्या फेऱ्या कमी पडत आहेत. जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली नाही. चाराटंचाई व रोजगारनिर्मितीच्या कामाबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्‍यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, मलठण (लाखेवाडी), मोराची चिंचोली, शास्ताबाद, खैरेनगर, पाबळ, केंदूर हा भाग अती दुष्काळी म्हणून जाहीर झाला आहे.

दुष्काळी गावात 8 टॅंकरची उपल्ब्धता
गाव फेऱ्या टॅंकर
केंदूर 2 1
खैरेनगर 2 1
पाबळ 8 4
मिडगुलवाडी 3 दोन दिवसांत 1
कान्हूर मेसाई 2 1

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या