शिरूर तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; जनावरांचे हाल

Image may contain: outdoor and nature
शिरूर, ता. 12 डिसेंबर 2018 (एन. बी. मुल्ला): शिरूर तालुक्यात चारा व पाण्याची भिषण टंचार्इ निर्माण झाली असून, तालुका दुष्काळाच्या गडद छायेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिरूर तालुक्यात पावसाअभावी शेतकऱयांना खरीप व रब्बी पिके घेता आली नाहीत. पावसाळयात एकही समाधानकारक पाऊस झाला नाही तसेच अवकाळी पाऊसही झाला नाही. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या, कांही शेतकऱयांनी धुळ वाफेत खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र, पावसाअभावी त्यादेखील वाया गेल्या. अवकाळी पाऊस लागून विहिरी भरतील तसेच पाणी पातळी वाढून विंधन विहिरींना पाणी येर्इल व रब्बी पिक घेता येर्इल, या आशेवर शेतकरी होता. मात्र, अद्याप असा एकही पाऊस न झाल्याने त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

चासकमानचे आवर्तनही सर्वांना पुरेल असे सोडले जात नाही. त्यामुळे येथेही बळीराजाची घोर निराशा होत असल्याने उभी पिकेही जळू लागली आहेत. खरीपा अभावी काळीभोर जमीन ओस पडली आहे. तर फळबागाही जळाल्या आहेत. माळरान उजाड पडले असून, शेळया मेंढयांना देखील चरण्यासाठी चारा नाही. सर्वत्र ओसाड माळरान व सुकलेली झाडे दुष्काळाची भिषणता दर्शवित आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने विहीरी व विंधन विहीरींनाही पाणी नाही. दूरवॄन भटकंती करून किंवा पाणी विकत घेण्याशिवाय लोकांसमोर पार्याय उरलेला नाही. चासकमानच्या आवर्तनाचा पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी तसेच जनावरासाठी उपयोग होत असल्याने नियमीत आवर्तन सोडणे गरजेचे झाले आहे. शिरूर तालुक्यातील गावांचा प्रशासनाने सर्वे करून आवश्यकता वाटल्यास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सूरू करण्याची तसेच दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या