रेशनिंग घोटाळ्यामध्ये शासकीय अधिकाऱयांचा सहभाग

शिरूर, ता. 17 डिसेंबर 2018: शिरूर शहर व तालुक्‍यातील विविध गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानातील (रेशनिंग) धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याचे वृत्त www.shirurtaluka.comने प्रसिद्ध केल्यानंतर नेटिझन्सनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया संकेतस्थळाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

निमगाव म्हाळुंगी येथील वाचकाने म्हटले आहे की, 'आमचा गावांमध्ये हेच दुकानदार ठरवतात की रेशनिंग यादीमध्ये कोणाचे नाव ठेवायचे. माझे नाव कमी केले. मी पुरवठा अधिकारी तहसील शिरूरला गेलो. त्यांच्या जवळ यादीची मागणी केली. पण, त्यांनी दिली नाही. वर त्या दुकानदाराला फोन करुन सांगितल की तुमचा गावचा माणूस आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकानदार मला म्हणाला, कोणाकडेही जा तुला रेशनिंग मिळणार नाही. यांचे हप्ते ठरलेले असतात की काय हेच मला समजले. आमचे हक्काचे रेशनिंग, पोल्ट्रीमध्ये जाते, याचे सर्व सेटींग असते यांची चौकशी झाली पाहिजे.'

सुरेश म्हणातात, 'आमच्या गावचा रेशन दुकानदार स्वतःला पंतप्रधानच समजतोय. रेशन देऊन जणू काही आमच्यावर उपकार करतोय, अशी त्याची भाषा असते.' के. पी. म्हणतात, 'नक्कीच चौकशी झाली पाहिजे, खुप मोठा काळाबाजार चालला आहे. पण, कुणीही गरिब जनता तोंड उघडत नाही.'

अनिल रामदास वाजे यांनी म्हटले आहे, 'काळा बाजारामध्ये वडनेर खुर्द हे गाव तालुक्यात प्रथम क्रमांकावर आहे. वडनेर मध्ये किलो मागे ३ ते ४ रुपये जास्त घेतले जातात. रेशन दुकानदार आर. डी. निचीत यांच्याकडे विचारणा केली असता आरेरावीची उत्तरे दिली जातात. गावातील काही राजकीय पुढार्यांच्या सहकार्याने हा काळाबाजार घडवला जातो. तालुक्यातील अधिकाऱयांचे सहकार्य यांना मिळते. शासनाच्या डिजिटल तक्रार निवारण प्रणालीवर तक्रार करुन सुद्दा यानांच उलट आश्रय दिला जातो. ही वडनेर गावची शोकांतिका आहे.'

शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया व मतचाचणीवरून रेशनिंग दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून, यामध्ये शासकीय अधिकारी सहभागी आहेत. याची चौकशी व्हावी, असे मत व्यक होत आहे.
www.shirurtaluka.com ने सोशल मीडियावर पुढील मतचाचणी घेतली होती.
शिरूर तालुक्‍यातील रेशनिंग दुकानांच्या चौकशीची मागणी करावी, असे आपणास वाटते काय?
होय - 91 टक्के, नाही - 9 टक्के.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या