कांद्याला भाव नसल्याने टाकले मेंढ्यांपुढे...

Image may contain: outdoorशिरूर, ता. 21 डिसेंबर 2018: कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीमाल कवडीमोल किंमतीत विकला जाण्यापेक्षा शेतकऱयांनी तो मेंढ्यांपुढे टाकण्यास सुरवात केली आहे.

उरळगाव (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने ते मेंढ्यांना टाकले आहेत. परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांचा शेतीमाल कवडीमोल किमतीने विकला जात आहे. कांद्यासह बहुतांशी भाजीपाला बाजारपेठेत नेईपर्यंत मजुरीसह इतर खर्च भागत नाही. त्यातच पोषक हवामान नसल्याने पिकांवर अनेक प्रकारचे रोग पडतात. त्यासाठी औषधांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेळ्या-मेंढ्यांना टाकण्याबरोबरच शेतामध्ये खत म्हणून गाडणे पसंत केले आहे. शेतकऱ्याला व्यापाऱ्यासह ग्राहकाच्या मागे लागून मिळेल त्या किमतीला माल द्यावा लागत आहे. ही परिस्थिती मागील एक-दोन वर्षांपासून सुरू असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी सरकारने शेतीमालाला परदेशी बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. गरज भासल्यास अनुदान देऊन शेतातील नाशवंत माल अधिक काळ टिकण्यासाठी सरकारने शीतगृह उभारावीत, अशी मागणी आलेगाव पागा येथील शेतकरी सुभाष भोसले यांनी केली आहे.

मंत्र्यांना कांदे फेकून माराः राज ठाकरे
कांद्याच्या घसरलेल्या दरावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला असून, "मंत्र्यांना कांदे फेकून मारा," असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. "नाशिक दौऱ्यावर असताना अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर व्यथा मांडली. एवढी मेहनत करुन तुमच्या पदरी निराशा पडत असेल, सरकार तुम्हाला आश्वासन देण्यास तयार नसेल तर कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा. इतकं सरळसोपं आहे. जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा. इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे. मग तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा. शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला मारा. मंत्र्यांना कांदा फेकून मारण्याचं माझं वक्तव्य एवढं पसरलं की ते सरकारपर्यंत पोहोचलं. सरकारने आता कांद्याला 200 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र कांद्याला दिलेल्या 200 रुपये प्रति क्विंटल अनुदानावर मी समाधानी नाही," असे राज ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले...

शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांद्याने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. गुरुवारी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही जातो. त्यामुळे या अनुदानासहित राज्य सरकारने कांदा जिल्ह्याबाहेरही पाठवण्यासाठीही अनुदान द्यावे अशी मागणीही पाटील यांनी केली. कांदयाची किंमत इतकी घसरली असताना सरकार किलोमागे फक्त दोन रुपये अनुदान देवून कसे परवडेल? नाशिकचा कांदा या अनुदानात गुजरात आणि दिल्लीपर्यंत कसा जाईल असा सवाल करतानाच सरकारने शेतकऱ्यांना वाढीव मदत दयावी अशी मागणीही पाटील यांनी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या