कोरेगाव भीमा परिसरात इंटरनेट सेवेवर प्रतिबंध

Image may contain: sky and outdoor

कोरेगाव भीमा, ता. 28 डिसेंबर 2018: गेल्या वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा व परिसरात २९ डिसेंबरपासूनच जादा दहापट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात एक जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध राहणार आहे.

पुणे-नगर महामार्गावर एक जानेवारीला पेरणे टोल नाका ते शिक्रापूर दरम्यान इतर वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरपासूनच या टप्प्यात १०० पीएमपी बसच्या साहाय्याने विजय स्तंभापर्यंत अंतर्गत प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतुकीसह सर्व सेवांच्या नियोजनाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. विजय स्तंभ परिसरात मोबाईल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असला तरी पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्‍यक साधने असणार आहेत.

परिसरात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने दोन महिन्यांत स्थानिक व्यापारी तसेच ग्रामस्थांच्या २५० पेक्षा जास्त बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमुळे स्थानिकांतही बंधुत्वाची भावना जागृत झाली आहे. स्थानिक पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिकांकडून मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवांचे स्वागत पाणी व फुले देऊन केले जाणार आहे.

No automatic alt text available.

कोरेगाव भीमा येथे 'अशी' असणार व्यवस्था
कोरेगाव भीमा, ता. 27 डिसेंबर 2018: कोगेराव भीमा येथे 1 जानेवारी रोजी होणाऱया कार्यक्रमावेळी चारही बाजूच्या आठ किलोमीटर परिसरावर ११ ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार असून, पोलिसांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा १५ पट अधिक असणार आहे.

नागरिकांसाठी ३०० पाण्याचे टॅंकर व १५० पीएमपीच्या बस असणार असून, 11 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजयस्तंभाचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या जागेचा तात्पुरता ताबा राज्य सरकारकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 26) दिला. या ठिकाणी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या जागेचा ताबा सरकारकडे द्यावा, अशी विनंती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दर वर्षी ३० डिसेंबर ते दोन जानेवारीदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होतात. विजयस्तंभाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये; तसेच कार्यक्रम सुरळीत व्हावा म्हणून नियोजन करण्यासाठी राज्य सरकारला या जागेचा ताबा हवा आहे, असा अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केला होता.

कार्यक्रम झाल्यानंतर जागा पुन्हा पूर्ववत करून देण्याची हमी त्यांनी राज्य सरकारच्या वतीने दिली. गेल्या वर्षी या काळात कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यभर उमटले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, म्हणून राज्य सरकारने या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या जागेचा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे सोपवण्यास न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने मान्यता दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या