शिरूर ग्रामीणच्या सरपंचांचे पद आले धोक्‍यात

No photo description available.शिरूर, ता. 4 जानेवारी 2019: शिरूर ग्रामीणचे सरपंच विठ्ठल घावटे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे त्यांचे सरपंचपद धोक्‍यात आले आहे. थेट जनतेतून निवडून आलेले ते शिरूर ग्रामीणचे पहिले सरपंच होते.

मे 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत श्री रामलिंग पॅनेलच्या विठ्ठल घावटे व श्री देव्हडेश्‍वर परिवर्तन पॅनेलच्या नामदेव जाधव यांच्यात सरपंचपदासाठी लढत झाली होती. इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या सरपंचपदावर घावटे यांनी विजय मिळविला होता. दरम्यान, घावटे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असून, त्यांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा करीत जाधव यांनी त्यांच्या जातप्रमाणपत्राला, जात पडताळणी समितीकडे तक्रार अर्जाद्वारे हरकत घेतली होती.

यावर सुनावणी होऊन जात पडताळणी समितीने घावटे यांच्या कागदपत्रांची पुनर्तपासणी केली. संबंधित अधिकारी, तक्रारदाराचे जबाब नोंदविल्यानंतर घावटे यांचा जातीचा दाखल अवैध ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रमोद यादव, सदस्य वासुदेव पाटील व सदस्य सचिव एच. एस. गाढे यांच्या समितीने हा निकाल दिला. शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी या निर्णयाबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. या वेळी नामदेव जाधव समर्थकांसह उपस्थित होते. त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. दरम्यान, माजी आमदार ऍड. अशोक पवार यांनी जाधव यांचा शाल, श्रीफळ देऊन व पेढा भरवून सत्कार केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या