शिरूरला 'हे' सांगून केली ज्येष्टांची लाखांची फसवणूक

Image may contain: one or more people and text
शिरूर, ता. 17 जानेवारी 2019: हज यात्रेसाठी अनुदान मिळवून देतो, असे सांगून ज्येष्ठ दांपत्याची सव्वा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार येथे घडला आहे. भामट्याने तीन तोळ्यांचे दागिने व तीस हजार रुपये असा सव्वा लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला. शेख अब्दुल हमीद पापामियॉं (वय 73, रा. सोनार आळी, शिरूर) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास शेख यांच्या पत्नी नसीम (वय 69) या भाजीबाजारात जात होत्या.  यावेळी जावेद हाजी हा तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने हज यात्रेसाठी अनुदान मिळवून देऊ शकतो, असे त्यांना सांगितले. सौदी हज कमिटीकडून काही रक्कम हज यात्रेसाठी मंजूर होऊन तहसीलदारांकडे आली आहे. ती मुस्लिम समाजातील ज्येष्ठांना मिळवून देण्याचे काम करतो. त्यासाठी तुम्ही गरीब आहात आणि दागिने मोडून हजला जाणार आहात, असे आमच्या साहेबांना सांगावे लागेल. शिवाय, तुम्हाला दागिने व रोख पैसे त्यांना दाखवावे लागतील, असे त्याने नसीम यांना सांगितले. नसीम यांनी घरी येऊन पती अब्दुल हमीद यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर ते दोघे घरांतील तीन तोळ्यांचे दागिने व तीस हजार रुपये एका पिशवीत घेऊन तहसील कार्यालयात गेले. जावेद याने साहेबांशी हमीद यांची ओळख करून देतो तोपर्यंत तुम्ही येथेच बसा, असे म्हटल्यावर नसीम या तळमजल्यावर थांबल्या. हमीद यांना घेऊन जावेद वरच्या मजल्यावर गेला. तेथे तुमचे आधार कार्ड साहेबांना दाखवून आणतो, असे सांगून तो निघून गेला. अर्धा तास झाला तरी तो येईना म्हणून हमीद खालच्या मजल्यावर आले. नसीम यांनी, तुमचे आधार कार्ड माझ्याकडे दिले व तुमचे काम झाले आहे. तुमच्या पतीला साहेबांसमोर बसविले आहे. दागिने व पैसे द्या. ते साहेबांना दाखवून घेऊन येतो, असे म्हणून पैशांची पिशवी जावेद घेऊन गेला, असे सांगितले. या दोघांनी दिवसभर त्याचा तहसील कार्यालयाच्या परिसरात शोध घेतला. मात्र, त्याचा तपास न लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस हवालदार रवींद्र पाटमास यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या