'शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक रोजगाराच्या संधी'

विठ्ठलवाडी, ता. 17 जानेवारी 2019: शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक रोजगार संधी निर्माण केल्याचा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे खासदार अमर साबळे यांच्या १५ लाख रुपये खासदार निधीतून केलेल्या पांडुरंग विद्या मंदिराच्या ३ वर्गखोल्यांच्या बांधकामाचे तसेच खासदार आढळराव यांच्या १० लाख रुपये निधीतून बांधण्यात येणाऱ्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन खासदार आढळराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पुणे-नगर महामार्गावर गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या सहा पटीने वाढल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी डीपीआर समिती नेमली असून तीन महिन्यात या समितीचा अहवाल आल्यानंतर युद्धपातळीवर रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते शिरूर हा रस्ता अडीच हजार कोटी रुपयांच्या निधीतून होणार आहे. त्यासाठी आपण स्वतः व आमदार बाबूराव पाचर्णे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार बाबूराव पाचर्णे, आरएसएस चे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संदीप जाधव, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, संस्थेचे उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे, हरिश्चंद्र गवारे, सरपंच, उपसरपंच, विभागीय संघचालक संभाजी गवारे, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, हिरामण गवारे, काळूअण्णा गवारे, माजी सरपंच अलका राऊत, मुख्याध्यापक सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

संदीप जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ग्रामविकासासाठी २० टक्के लोकसहभाग असेल तर विकास कामाचे महत्त्व ही समाजाला समजते. त्यामुळे दर्जेदार काम करून घेण्यासाठी नागरिक पुढाकार घेतात असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी तिळगुळ वाटप कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी गवारे यांनी केले. रघुनंदन गवारे यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप गवारे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या