'...तर शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून लढणार'

Image may contain: 1 person, smiling, eyeglasses, selfie and closeup
राजगुरुनगर, ता. 25 जानेवारी 2019 : शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले तर लढणार, अशी प्रतिक्रिया भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिली आहे. यामुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असले? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

विलास लांडे म्हणाले, 'उमेदवारीसाठी मी गुडघ्याला बाशिंग बांधलेले नाही, पक्षश्रेष्ठींशी चर्चाही नाही, पण पक्षाने तिकीट दिले तर लढणार. मतदारसंघात पक्षाचे आणि माझे काम चांगले आहे, एका निवडणुकीचा अनुभवही आता गाठीला असल्याने अडचण येणार नाही.'

दरम्यान, विलास लांडे हे उमेदवार असल्याचे संकेत अलीकडच्या राजकीय घडामोडींवरून आणि मतदारसंघात त्यांच्या वाढत्या संपर्कावरून मिळत आहेत. राजकीय वर्तुळातही या चर्चेला पुष्टी मिळत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यातील कार्यक्रमांना लांडे हजेरी लावत आहेत. शिवाय, त्यांचे समर्थक त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करून समाजमाध्यमांमध्ये पोस्ट टाकत आहेत. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली. एका पक्षाचे असले तरी त्यांच्यात सख्य नव्हते. मात्र, लांडे यांनी पुढाकार घेऊन त्यांची भेट घेतल्याने दिलजमाईसाठी त्यांचे प्रयत्न चालल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याशीही त्यांनी जमवून घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर त्या दोघांमध्ये विधानसभा लोकसभा वाटणी झाल्याचे बोलले जात होते. खरेच तसे झाल्यास भोसरीतून ते चांगले मतदान घेऊ शकतील. लांडे यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्याने लोकसभेसाठी त्यांना हिरवा कंदील मिळाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या