पुणे-शिरूर रस्ता होणार सहापदरी; हुश्यSSS...

Image may contain: sky, car and outdoor
शिरूर, ता. 26 जानेवारी 2019: पुणे-शिरूर रस्त्यावरून प्रवास म्हटले की अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांनाही रस्ता मिळत नाही, अशा परिस्थितीत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. पण, पुणे-शिरूर हा रस्ता आता सहापदरी होणार असून, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'भारतमाला' योजनेत करण्यात आला आहे.

पुणे ते औरंगाबाद अंतर अवघ्या दोन तासांत पूर्ण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे- शिरूरपर्यंतच्या 64 किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश "भारतमाला' योजनेत करण्यात आला आहे. हा रस्ता "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे. त्यातून आता हा रस्ता सहापदरी करण्याचा मार्ग खुला झाला आहे. जुलैअखेर कामाला सुरवात होणार आहे.

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा दळणवळण वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारने राज्यातून जाणाऱ्या व महामार्गांना मिळणाऱ्या रस्त्यांनुसार 12 "इकॉनॉमिक कॉरिडॉर' निश्‍चित केले आहेत. पुणे- औरंगाबादचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या "कॉरिडॉर'अंतर्गत त्या- त्या जिल्ह्यांतून राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम येत्या वर्षात हाती घेतले जाणार असून, दोन वर्षांत ते पूर्ण करण्यात येणार आहे.

पुणे-औरंगाबाद प्रवासाला सध्या चार ते पाच तास लागतात. नगर ते औरंगाबाद दरम्यान सहापदरी रस्ता झाला आहे. परंतु, पुणे- शिरूर दरम्यान वाघोली, केसनंद, शिरूर परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे या प्रवासाला विलंब लागत आहे. पुणे- औरंगाबाद हे 230 किलोमीटरचे अंतर दोन तासांत पार करणे शक्‍य असल्यामुळे या रस्त्याचा समावेश "इकॉनॉमिक कॉरिडॉर'मध्ये करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-शिरूर हा रस्ता सहापदरी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) मुंबईतील विभागीय कार्यालयाने दिली.

पुणे-शिरूर या 64 किलोमीटरच्या टप्प्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार निश्‍चित झाला आहे. त्याला 15 फेब्रुवारीपर्यंत "वर्क ऑर्डर' देण्यात येईल. त्यानंतर जुलैअखेरपर्यंत त्यांच्याकडून अहवाल सादर झाल्यावर ऑगस्टपासून कामाला प्रारंभ होईल, असेही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात शिरूर-नगरचा समावेश करण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या