आर्इच्या पोटात असताना बाळाला भरले रक्त...
मांडवगण फराटा,ता.३१ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : आर्इच्या पोटात असताना बाळाला रक्त भरण्याची ही पहिलीच दुर्मिळ घटना मांडवगण फराटा परीसरात घडली असून डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून दाखविल्यामुळे बाळाला वाचविण-या डॉक्टरांचे परीसरातून कौतूक होत आहे.
सविस्तर असे कि,शेतकरी नवनाथ दोरगे हे मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील रहिवासी आहेत. त्यांची परीस्थिती गरीब असुन ते दूध व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या पती पत्नीला एक अपत्य आहे.हे अपत्य झाल्यानंतर नवनाथ दोरगे व सिमा दोरगे यांनी काही दिवसानंतर दुस-या अपत्याचा विचार करून गर्भ ठेवण्याचे ठरविले. रक्तगट निगेटीव्ह असल्याने अँटी डी नावाचे एक इंजेक्शन जे जन्मलेल्या बाळाचा रक्तगट पॉझिटिव्ह आणि आर्इचा रक्तगट निगेटीव्ह असल्याने दयावे लागते.जे इंजेक्शन काही कारणाने पहिल्या डिलेव्हरीच्या वेळेस देण्यात आले नव्हते, त्यामुळे मूल जन्मले की दोन चार दिवसातच दगावत होते.
त्यामुळे या पती पत्नीच्या पदरी कायम निराशाच पडत होती कारण ज्यावेळेस सिमा दोरगे यांची डिलेव्हरी होत होती त्या वेळेस ते मूल जन्माला येत होते मात्र दोन तीन दिवसातच ते दगावत होते असा प्रकार कायम घडत होता. त्यासाठी त्यांनी प्रत्येकवेळी चांगल्यात चांगल्या डॉक्टरांची ट्रिटमेंट घेउन प्रयत्न केले परंतू कुठेच यश आले नाही.शेवटी त्यांनी हताश होउन त्यांची व्यथा मांडवगण फराटा येथील डॉ.अतुल सुराणा व (पाटस ता.दौंड) येथील डॉ धवल वैदय यांना सांगितली व या दोन्ही डॉक्टरांनी आपण पूर्ण प्रयत्न करून बाळ सुखरूप आर्इच्या हातात देण्याचा चंग बांधला व त्यांना गर्भधारणेसाठी मागदर्शन सुरू केले. गर्भधारणा झाली पण डॉक्टरांची खरी कसोटी ही चौथ्या महिन्यानंतरच लागणार होती. त्यानुसार ५ व्या महिन्यातील सोनोग्राफी दौंड येथील डॉ.चैतन्य जोशी व डॉ. अश्विन वाळके यांनी केली असता बाळाच्या पोटामध्ये थोडेसे पाणी झाल्याचे निदर्शनात आले.त्यानंतर या सर्व डॉक्टरांनी पुढील ट्रिटमेंट पुण्यातील उमरजी हॉस्पीटलचे डॉ. चिन्मय उमरजी यांच्याकडे करावयाची ठरवून डॉ.चिन्मय उमरजी यांना पेशंटच्या आर्थीक परीस्थतीची कल्पना दिली.
त्यानंतर डॉ. उमरजी यांनी असेल तेवढया पैशामध्ये उपचार करण्याचे आश्वासन दिले.डॉ. चिन्मय उमरजी यांनी पैसे नसतील तरीही तुम्ही उपचार सोडू नका असा सल्ला देउन दोरगे दाम्पत्याचा आत्मविश्वास वाढवला.व त्यानंतर नवव्या महिन्यापर्यंत पोटातील गर्भाला पाच वेळा रक्त भरून सिमा दोरगे यांची डिलीव्हरी सुखरूप पार पाडून त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
गेले चौदा वर्षानंतर या नवनाथ दोरगे व सिमा दोरगे यांना अपत्य प्राप्त झाले आहे. जर प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि नशीबाची साथ असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही या उक्तीप्रमाणे हा अनुभव आम्हाला आला असून डॉक्टरांच्या रूपात आम्हाला देव भेटल्याची प्रतिक्रिया दोरगे कुटूंबीयांनी बोलताना व्यक्त केल्या.