'..तरी जिंकणारच; साहेब, माझी जात काढू नका'

Image may contain: 2 people, beard, hat and eyeglasses
शिरूर, ता. 6 मार्च 2019: राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवले आहे, असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटल्यानंतर साहेब माझी जात काढू नका, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. यामुळे शिरूर लोकसभा निवडणूकीची रंगधुमाळी आतापासून रंगू लागली आहे.

कितीही कोल्हेकुई केली, तरी जिंकणारच: आढळराव पाटील
शिरुर लोकसभेत कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणारच असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटल यांनी हा टोला लगावला.

राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवले आहे. गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता, अशी टीकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरचे विद्यमान खासदार असून सलग तिसऱ्यांदा ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2014 मधील निवडणुकीत तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

साहेब, माझी जात काढू नकाः डॉ. अमोल कोल्हे
माझी जात कोणती ते विचार नका. माझी जात ही ‘शिवरायांचा मावळा’ अशीच आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला. शिवाजी महाराज व संभाजी महाराज्यांच्या भूमिकेतील माझे छायाचित्र कोणत्याही बॅनरवर वापरू नका, असा सल्लाही डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे मराठा नाहीत हेच सांगण्याचा हेतू खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा होता. त्यात ते यशस्वी झाले आहेत. आता अमोल कोल्हेंसाठी माळी व पर्यायाने ओबीसीही मैदानात उतरू शकतात. मात्र, कोल्हे यांनी आपण ‘शिवरायांचा मावळा’ असल्याचे सांगून आढळरावांवर टीका केली आहे. दरम्यान, शिरूरमध्ये आगामी काळात मराठा विरूद्ध माळी (ओबीसी) वाद दोन्ही बाजूंनी पेटवला जाणार हे उघड आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघावर शिवाजीराव आढळराव पाटील यांची घट्ट पकड आहे. 2004 साली अवघ्या 20 हजार मतांनी विजयी झालेले आढळराव 2009 मध्ये 1 लाख 80 हजार मतांनी विजयी झाले तर 2014 साली मोदी लाटेत शिवसेनेच्या तिकीटावर आढळराव यांनी साडेसहा लाख मते घेत तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. आताही आपण मोठ्या फरकाने जिंकणार असा विश्वास आढळराव व्यक्त करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या