मातेच्या तीन लेकी बनल्या पोलिस अधिकारी (Video)

इनामगाव, ता. ८ मार्च २०१९(सतीश केदारी) :  स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी त्या आदर्श मातेने तिनही मुलींना पोलीस अधिकारी बनवुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

इनामगाव (ता. शिरूर) येथील मंगल भरत म्हस्के या स्वत: चौथीपर्यंत शिकलेल्या परंतु आपल्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नाही असा चंगच मनाशी बांधला. चाकोरीबद्ध जीवनाच्या रूढी परंपरांना मूठमाती देत आपल्या तीन लेकींना त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण दिले. या तिन्ही मुली स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड होऊन पोलिस दलाच्या विविध खात्यांत अभिमानाने काम करत आहे. विशेष म्हणजे मंगल म्हस्के या स्वतः अल्पशिक्षित असल्या तरी इनामगाव गावाच्या त्या विद्यमान सरपंच आहेत. संसाराबरोबरच गावगाडाही त्या तेवढ्याच जोमाने आणि आत्मविश्वासाने चालवत आहेत. 

मंगल म्हस्के यांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय सांभाळत मोठ्या नेटाने संसाराचा गाडा सांभाळत आहेत. कुटुंब चालवताना आपली मुले ही केवळ उच्चशिक्षितच असावी असा निर्धार त्यांनी सुरवातीपासूनच ठेवला होता. चूल आणि मूल या पारंपरिक भूमिकेला छेद देत आपल्या मुलींचे संपूर्ण लक्ष शिक्षणाभोवती केंद्रित केले. कीर्ती म्हस्के यांनी 2010 मध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिली, आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी पोलिस उपनिरीक्षक पदावर पोलिस खात्यात रुजू झाल्या. बहिणीच्या यशाने शुभांगी म्हस्के, गिरिजा म्हस्के यांच्यातही मोठा आत्मविश्वास निर्माण झाल्याने त्यांनीही 2011 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी मोठ्या जोमाने केली. व त्याही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. शुभांगी म्हस्के या सध्या पुण्यातील राज्य गुप्त वार्ता विभागात, गिरिजा म्हस्के कार्पोरेशन अतिक्रमण विभागात तर कीर्ती म्हस्के कोंढवा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. तीनच दिवसांपूर्वी गिरिजा व कीर्ती या दोन्ही बहिणींना एकाच दिवशी सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली.

मंगल म्हस्के या इनामगावच्या विद्यमान सरपंच म्हणूनही जोमाने काम करत आहेत. त्यात त्यांचा प्रमुख भर शिक्षण क्षेत्रावर असून, गावातील वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या भाग शाळांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरवठा करून निधी उपलब्ध केला आहे.साठीच्या वयातही आजही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत तरुणांना लाजवेल अशीच आहे. घरातील एक महिला किमान सुशिक्षित झाली, तर ती खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबाचा भार पेलण्यास, त्यांना दिशा देण्यास कशी सक्षम बनते हेच मंगल म्हस्के यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कर्तृत्वाने दाखवून दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या