कारेगावला महिलादिनी रणरागिणींचा रुद्रावतार (Video)

Image may contain: 7 people, outdoor
कारेगाव, ता. ९ मार्च २०१९ (तेजस फडके) : जागतिक महिला दिनानिमित्त कारेगाव येथील जिजाऊच्या लेकींनी गावातील अवैध धंदे चालू असलेल्या ठिकाणी जाऊन ऑनलाइन लॉटरी, बिंगो, दारु, मटका हे व्यवसाय चालू असलेल्या दुकानावर अचानक हल्लाबोल करत या व्यवसायाशी संबधीत वस्तू रस्त्यावर आणून फोडून टाकल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारेगाव येथे मुख्य चौकातच मोठया प्रमाणात बिंगोची दुकाने व बेकायदेशीर दारूची दुकानं आहेत.तसेच येथे भाजी बाजार, किराणा माल व कपड्याची दुकाने आहेत. सायंकाळी औद्योगिक वसाहतीत कामाला असणाऱ्या महिला याच रस्त्याने घरी जात असतात. अनेक महिला तेथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी व इतर खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या दारुड्यांकडुन अनेक वेळा महिलांना त्रास सहन करावा लागतो. कारेगाव येथे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. परंतु अवैध धंद्याकडे पोलीस मात्र डोळेझाक का..? करतात असा प्रश्न उपस्थित होत असुन कारेगाव येथे बिंगो लॉटरी मोठया प्रमाणात चालू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले असुनही पोलीस मात्र कारवाई करत नाहीत असा नाराजीचा सुर महिलांकडुन व्यक्त होत आहे. तसेच गावातील काही राजकीय व्यक्ती यात हस्तक्षेप करुन चिरीमिरी देऊन हे धंदे बंद होऊ देत नाहीत. अशी खात्रीलायक माहिती अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

शुक्रवारी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गावातील ग्रामपंचायत सदस्या अर्चना नवले, दुर्गा नवले, राखी नवले, मनिषा नवले, पल्लवी नवले,ललिता तळेकर, सारीका तळेकर,सविता तळेकर, सविता नवले, दिपा दळवी, साधना दळवी, सरस्वती गावडे, मिना गावडे, नंदा नवले, कल्पना वडघुले, रागिणी नवले,अर्चना नवले, अनिता औटी, ज्योती नवले, शितल नवले,सुषमा बांदल, निर्मला गवारे, ताराबाई नवले, अर्चना तळेकर, सुवर्णा सोनवणे या सर्व महिलांनी कारेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर निवेदन दिले.

त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बिंगो लॉटरी चालु असलेल्या दुकानाकडे वळवला. परंतु बिंगो वाल्यांना आधीच माहिती मिळाल्याने त्यांनी दुकाने बंद करुन सर्व साहित्य आत ठेऊन पोबारा केला. परंतु महिलांनी रणरागिणीचे रुप धारण केल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी कुलुप तोडुन  अवैध दारूचा साठा केलेल्या दुकानांची तोडफोड केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारुचे बॉक्स आढळुन आल्याने महिलांनी दारूच्या बाटल्या फोडुन अवैध दारु नष्ट केली. यावेळी गावातील युवक मोठया प्रमाणात महिलांच्या मदतीसाठी एकत्र आले.त्यांनी महिलांना यावेळी मोठया प्रमाणात सहकार्य केले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या