शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण?

Image may contain: 2 people, people smiling, hat, beard and eyeglasses
शिरूर, ता. 9 मार्च 2019: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार पाहिजे, त्याला हात वर करून "कौल' देण्याचा "अजब फंडा' वापरत आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघातील जनमत अजमावल्याने "आता शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण?', याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

जनकौलाचा आदर राखून उमेदवारीचा निर्णय झाल्यास, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात "राष्ट्रवादी' च्या उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्‍यता आहे. अजित पवार यांनी तुमच्या मनातील उमेदवार दिला जाईल, असे वक्तव्य आंबेगाव व शिरूरच्या मेळाव्यात केले. थेट जनभावनेलाच हात घातला. तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला हात वर करून पाठिंबा द्या, असे आवाहन करीत त्यांनी डॉ. कोल्हे यांच्यासह भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांची नावे पुकारून उपस्थितांचा कौल घेतला; यात दोन्ही हात वर करून टाळ्या-शिट्यांच्या गजरात उपस्थितांनी डॉ. कोल्हे यांना उत्स्फूर्त पसंती दिल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. डॉ. कोल्हे यांचे नाव पुढे होताच विलास लांडे यांच्या चेहऱयावरील हावभाव बदलत डोक्यावरील फेटा काढून बाजूला ठेवला.

भोसरीच्या मेळाव्यात, भाषण सुरू असताना लांडे समर्थकांनी त्यांचा जयघोष सुरू करताच, माझ्या भाषणात घोषणा देऊ नका, नाहीतर तिकीट कापेन, असा सूचक इशारा देताना लांडे यांच्या "फ्लेक्‍स प्रचार' यंत्रणेलाही अजितदादांनी तंबी दिली. या मेळाव्यांतील घडामोडींनंतर लांडे काय निर्णय घेणार याकडेही लक्ष लागले असून, लांडे सोडून बाहेरचा उमेदवार लादल्यास आम्ही "राष्ट्रवादी' चे काम करणार नाही, असा पवित्रा घेत लांडे समर्थकांनी सोशल मिडीयावर हा "इशारा संदेश' काल रात्रीपासूनच "व्हायरल' करायला सुरवात केली आहे. या दबावतंत्राखाली उमेदवारीचा निर्णय होणार की जनभावनेचा आदर राखला जाणार, अशी उत्सुकता असून, ऐनवेळी याच मतदार संघातील बड्या नेत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्याचे धक्कातंत्र अजितदादा वापरणार, याकडे मतदार संघासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या