Loksabha 2019 : उमेदवार खर्चाचे दरपत्रक असे...

शिरूर, ता. 28 मार्च 2019 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवाराला खर्चाची मर्यादा घालून दिलेली आहे. पुणे जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरसूचीनुसार चहासाठी चार रुपये, तर कॉफीसाठी ५ रुपये याप्रमाणे उमेदवाराला खर्च सादर करावा लागणार आहे. वडापावसाठी १२ रुपये, पोहे, उपीट प्लेटसाठी १० रुपये, मांसाहारी जेवणासाठी १४० रुपये, तर शाकाहारी थाळीसाठी ७० रुपये याप्रमाणे खर्च निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार सभा, पदयात्रा काढाव्या लागतात. त्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, परंतु उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच खर्च करावा लागतो. या खर्चावर देखरेख ठेवण्याचे काम निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या पथकांमार्फत केले जाते. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे मोजमाप करण्यासाठी निवडणूक आयोगानेही दरपत्रक तयार केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघांचे दरपत्रक निश्‍चित करण्यात आले आहे.

प्रचार साहित्यासाठी साधा फेटा १५०, गांधी टोपी १५ रुपये, शाल १०० रुपये, पुणेरी पगडी ३५० रुपये, तर ७ ते ११० रुपयापर्यंत झेंड्याचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. बिल्ला प्रतिनग ३० रुपये, मंडप, खुर्च्या, हारतुऱ्यांपासून फटाक्यांपर्यंत दर निश्‍चित करण्यात आले आहेत. १००० फटाक्यांची माळ १५० रुपयांना, तर ५ हजार फटाक्यांची माळ साडेसातशे रुपये याप्रमाणे उमेदवारांच्या खर्चाची नोंद होणार आहे. निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भाड्याने वापरण्यात येणाऱ्या गाड्यांचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या